Job Alert
Job Alert Tendernama
विदर्भ

Good News : जिल्हापरिषदेत होणार 561 रिक्त पदांची भरती

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नोकर भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी जिल्हा परिषदेकडून आनंदाची बातमी आली आहे. जिल्हा परिषद 561 रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करणार आहे. जिल्हा परिषदेच्या 20 विभागांमध्ये वर्ग 3 (तृतीय श्रेणी) ची पदे भरण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपिन जाधव यांनी भरती प्रक्रियेसाठी आयबीपीएस कंपनीशी करार केला असल्याची माहिती दिली.

राज्यभरात 18,939 पदे भरण्यात येणार आहेत

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग ग्रामविकास विभागाने खुला केला आहे. राज्यभरात 18 हजार 939 पदे भरण्यात येणार आहेत. नागपूर जिल्हा परिषदेच्या 20 विभागातील 561 रिक्त पदे भरण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. आयबीपीएस ने भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार केला आहे. रिक्त पदे भरण्यात जिल्हा परिषदांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची माहिती ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी दिली. जिल्हा परिषदेने जानेवारी महिन्यात रिक्त पदाचा अंतिम आराखडा सरकारकडे पाठविला होता.

कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने 4 मे 2020 रोजी शासन निर्णय जारी करून राज्यातील कर्मचारी भरतीवर बंदी घातली. कोरोनाच्या संकटातून दिलासा मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सरकारने राज्यातील 75 हजार पदे थेट सेवा भरती पद्धतीने भरण्याची घोषणा केली. सर्व विभागांना 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या अधिनस्त असलेल्या सर्व विभागांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना विहित कमाल वयोमर्यादेत 2 वर्षांची सूट दिली आहे.

परिक्षेच्या माध्यमातून होणार निवड : 

कर्मचारी भरती प्रक्रिया परीक्षेद्वारे होईल. आयबीपीएस कंपनी परीक्षेचे आयोजन करेल. परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल. भरती प्रक्रियेची माहिती देण्यासाठी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी आणि भरती प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही याची काळजी घेण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी करण्याचे सांगण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी कारणाऱ्या युवकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.