RTMNU
RTMNU Tendernama
विदर्भ

Nagpur University Tender Scam : धक्कादायक! विना टेंडर सुरक्षारक्षक कंपनीला दिले काम; जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (RTMNU) टेंडर (Tender) शिवाय दीड वर्षांपासून एका विशिष्ट सुरक्षारक्षक कंपनीला नेमण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंपनीने अधिकाऱ्यांकडून वाढीव बिले सादर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार (Scam) केल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती तयार करण्याचे आदेश प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी दिले. 

याबाबत अॅड. मनमोहन वाजपेयी यांनी प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावावर चर्चा करताना अॅड. वाजपेयी यांनी विद्यापीठामध्ये सुरक्षारक्षक नेमण्यासाठी दोनदा टेंडर मागविण्यात आल्या. मात्र, या दोन्ही टेंडरमध्ये आलेल्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले नाही. मात्र, त्यानंतर जुन्याच कंपनीला पुन्हा परस्पर काम देण्यात आले. दरम्यान त्यांनी केलेल्या कामाचे वाढीव बिल देत, ते विद्यापीठाकडून मंजूर करण्यात आले नाही.

यावर अॅड. वाजपेयी यांनी कंपनीला देण्यात आलेल्या पेमेंटची बिले अधिकाऱ्यांकडून न तपासून परस्पर देण्याचा आरोप करीत, त्याची कागदपत्रे असल्याची माहिती दिली. त्यावर विष्णू चांगदे यांनी या प्रक्रियेत घोळ असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली.

दरम्यान त्याबाबत प्रशासनाकडून थातूरमातूर उत्तर आल्याने या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावरून कुलगुरूंनी या प्रकरणाची समितीकडून चौकशी करण्याचे आदेश दिले.

अधिकाऱ्यांकडून उत्तर येईना

अॅड. वाजपेयी यांनी प्रस्तावावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर या विषयावर बोलण्यासाठी एकही अधिकारी तयार नसल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, याबाबत सर्वच कागदपत्रे माहितीच्या अधिकारात मिळाली असल्याचे समोर येताच, अधिकारीही सुन्न झाले. त्यामुळे कुलगुरूंनी सदस्यांची मागणी मान्य करीत, चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली.