Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal Corporation Tendernama
विदर्भ

Nagpur : कोट्यवधींची कामे अपूर्ण; ठेकेदारांचे मात्र 'अच्छे दिन'

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : महापालिकेच्या कासव गतीमुळे शहरात मागील वर्षी आणि त्यापूर्वीही सुरू झालेले विकासकार्य आताही अपूर्ण अवस्थेत दिसून येत आहे. जवळपास 904 कोटींची कामे अपूर्ण पडली आहे. विशेष म्हणजे महापालिकेने ही कामे सुरू करण्यासाठी कोटयवधी खर्च केले, परंतु कामे रखडली आहेत. दरवर्षी प्रकल्पांची किंमत वाढत असल्याने कंत्राटदारांचे मात्र अच्छे दिन सुरु आहे. शहरातील सक्करदरा, सोनेगाव, गांधीसागर, नाईक तलाव, लेंडी तलावाची कामे महापालिकेने सुरू केली. या तलावांच्या सौंदर्यीकरणावर एकूण 125 कोटी 30 लाख रुपये खर्च प्रस्तावित आहे. या तलावाच्या कामांची किंमत वाढली आहे.

या तिन्ही तलावाच्या कामाची मूळ किंमत 58 कोटी 32 लाख होती. या प्रकल्पांवर आतापर्यंत एकूण 35 कोटी रुपये खर्च झाले. परंतु अजूनही सौंदर्यीकरण पूर्ण झाले नसून तलावाची दुर्दशा दिसून येत आहे. याशिवाय 13 कोटींच्या नाईक तलावाच्या कामांवर दीड कोटी खर्च करण्यात आले आहे. सोबतच विद्यापीठ ग्रंथालयाजवळ नाग नदीवरील पूल 8.38 कोटी,  सुरेंद्रगढ शाळेचे बांधकाम 1.61 कोटी, पीएमएवाय अंतर्गत 480 गाळे 51.55 कोटी, ऑरेंज सिटी स्ट्रीट कमर्शियल कॉम्प्लेक्स 51.51 कोटी, मिनीमातानगर यूपीएचसी बांधकाम 14 कोटी (पाच कोटी खर्च) हे सर्व प्रकल्प अजूनही रखडलेले आहे.

जुना भंडारा रोड प्रकल्प किंमत 330 कोटी, खर्च 25 कोटी, रामजी पहलवान रोड : खर्च 12 कोटी या प्रकल्पांची भूसंपादनाची प्रक्रिया रखडलेली आहे. सोबतच सिमेंट रस्ते पहिला टप्पा प्रकल्पाची किंमत 104 कोटी, शिल्लक कामांची किंमत 9 कोटी 62 लाख, सिमेंट रस्ते तिसरा टप्पा प्रकल्पाची किंमत 300 कोटी, शिल्लक रस्ते-17 हे सर्व सीमेंट रस्ते अजूनही अर्धवट आहे. नागपूर सिटीझन फोरम चे अभिजित झा यांनी सांगितले की, सुरेंद्रगढ शाळेसाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला. त्यानंतर कामे सुरू झाली. ही कामे वेळेत व दर्जेदार व्हावी ही अपेक्षा आहे. तलाव सौंदर्यीकरणाचे प्रस्ताव तर अनेकदा बदलले. महापालिकेने या कामांना गती दिल्यास तलावांच्या बाबतीत नागपूर शहर भोपाळपेक्षाही सुंदर होऊ शकते.

14 कोटींच्या लेंडी तलावाच्या कामावर केवळ 1 कोटी खर्च झाले. तलावच नव्हे जुना भंडारा रोड तसेच रामजी पहलवान रोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया मागील वर्षापासून सुरू आहे. या प्रकल्पावर आतापर्यंत 37 कोटी खर्च झाले. पण भूसंपादनाचा प्रश्न अद्यापही मिटला नसल्याने दोन्ही रस्त्यांचे रुंदीकरण रखडले आहे. याशिवाय साडेआठ कोटींचा नाग नदीवरील पूल, दीड कोटीचे सुरेंद्रगढ शाळेचे काम, 51  कोटी 55 लाखांची पंतप्रधान आवास योजना, 51 कोटी 51 लाखांचे ऑरेंज सिटी स्ट्रिट वाणिज्य संकुल, 14 कोटींचे मिनीमातानगर येथील आरोग्य केंद्राचे काम मागील वर्षी सुरू झाले. परंतु कोणतीही कामे अद्याप पूर्ण झालेली नाही. विशेष म्हणजे सिमेंट रस्ता टप्पा एकची कामे 2018 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. पण 9.62 कोटींची कामे शिल्लक आहेत. याशिवाय सिमेंट रस्ता टप्पा तीनमधील 17 रस्त्यांची कामे झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कामे अर्धवट असल्याने नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.