Nagpur Metro
Nagpur Metro Tendernama
विदर्भ

Nagpur : मेट्रोच्या फेज-2 चे काम एप्रिलमध्ये सुरु होणार

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित (Brijesh Dixit) यांनी बहुप्रतिक्षित मेट्रो फेज-2 प्रकल्पाचे काम एप्रिलमध्ये सुरू होणार असल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आशियाई विकास बँकेने (ADB) 1,520 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे तर युरोपियन गुंतवणूक बँकेने 2,058 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाची पायाभरणी केल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग आला, असे ते म्हणाले. मेट्रोचा दुसरा टप्पा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असले तरी त्यापूर्वीच हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत येईल, असा विश्वास डॉ. दीक्षित यांनी दाखविला.

दुसऱ्या टप्प्यात बुटीबोरीपर्यंत मेट्रो रेल्वेचा विस्तार करण्यात येणार असून हे अंतर 19 किमी आहे. लोकमान्य नगर स्थानक ते हिंगणापर्यंत सात किमीचे मेट्रोचे जाळे विस्तारले जाईल, तर ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हानपर्यंत 13 किमी आणि प्रजापती नगर ते कापसीपर्यंत 5.5 किमी मेट्रोचे जाळे टाकण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात एकूण 44 किमी मेट्रो रेल्वेचे जाळे टाकण्यात येणार आहे. सध्या मेट्रो रेल्वे रात्री 10 वाजेपर्यंत चालते. रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरु ठेवला जाईल. लोकांची मागणी असल्यास मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मेट्रो सेवा सुरू राहील, असे डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

मेट्रो रेल्वेच्या तिकीट विक्रीव्यतिरिक्त, नागपूर मेट्रोला मालमत्ता विकासातून 200 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. यामध्ये वार्षिक 300 कोटी रुपयांपर्यंत महसूल निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे नागपूर मेट्रो ही देशातील एकमेव फायदेशीर मेट्रो ठरणार आहे. सध्या नागपूर मेट्रो वर्षाला 20 ते 25 कोटींचा तोटा करत असल्याचेही ते म्हणाले. स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. दीक्षित म्हणाले की, 2015 मध्ये पाहिले तर नागपूर मेट्रोच्या डीपीआरशिवाय काहीही नव्हते. खूप आव्हाने होती पण आम्ही ती कमी कालावधीत पार केली. आम्ही नागपुरातील वाहतुकीची पद्धत तसेच जीवनशैली बदलू शकलो याचा आम्हाला आनंद आहे, असे ते म्हणाले.