नाशिक (Nashik) : मुंबई-नागपूर ७०० किलोमीटर लांबीच्या नैसर्गिक वायू पाईपलाईनने आपला अंतिम चाचणी टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. यामुळे आणखी काही दिवसांतच नागपूर शहरात सीएनजीचा पुरवठा होऊ शकणार आहे.
पीएम गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत १,७०० किलोमीटर लांबीच्या मुंबई-नागपूर-झरसुगुडा नेटवर्कचा मुंबई-नागपूर गॅसपाईप लाईन हा एक भाग असून, त्याची एकूण किंमत ८,००० कोटी रुपये आहे. यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि ओडिशा राज्यांमध्ये स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारी ऊर्जा उपलब्ध होईल. या प्रकल्पाचे नाशिकपर्यंतचे काम याआधीच पूर्ण झाले असून नाशिकला गॅसपुरवठाही सुरू झालेला आहे.
केंद्र सरकारच्या नैसर्गिक वायू वितरण विस्तार योजनेतून मुंबई-नागपूर-झरसुगुडा हा गॅस पाईपलाईन प्रकल्प उभारण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले होते. हा प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे.
आता मुंबई ते नागपूर या प्रकल्पाची चाचणी झाली असून जीएआयएल (GAIL) कंपनीकडून नागपूरच्या एचसीजी (HCG) कंपनाच्या माध्यमातून नागपूरला सीएनजी (CNG) पुरवठा सुरू होईल, ज्यामुळे पाईपबंद नैसर्गिक वायू (PNG) चे वितरण सुरू होईल. तसेच नागपूरमधील औद्योगिक कार्यक्षमतेत वाढ होईल.
या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या मागास विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात स्वच्छ इंधन उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे उत्पादन खर्चात कपात होईल व नवीन गुंतवणुकीचे दरवाजे उघडतील. या प्रकल्पामुळे लहान-मध्यम उद्योगांच्या इंधन खर्चात २० ते ३० टक्के बचत होणार आहे.
या पाईपलाईन उभारण्यातून याआधीच ५ लाख मनुष्यदिनांचा रोजगार निर्माण झाले असून, भविष्यात २६ लाख घरगुती गॅस जोडणी (PNG कनेक्शन) आणि ५५० पेक्षा अधिक सीएनजी (CNG) पुरवठा केंद्र उभे राहणार आहेत.
नाशिकपर्यंतचा टप्पा पूर्ण
या गॅस पाईपलाईन प्रकल्पाचा नाशिकपर्यंतचा टप्पा या आधीच पूर्ण झाला आहे. नाशिक शहरात पाईपबंद घरगुती गॅस (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठ्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) या कंपनीवर जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिसिटेडने (MNGL) नाशिकसाठी १,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, यात मुंबई-नागपूर नैसर्गिक वायू पाइपलाइनचा समावेश आहे.
या कंपनीने नाशिक शहरात पाईपबंद घरगुती गॅससाठी भूमीगत पाईपलाईन टाकली आहे. एमएनजीएलने पाथर्डी फाटा येथे एलएनजी (LNG) ते पीएनजी (PNG) प्रक्रिया प्लांट उभारले आहे. यामुळे नाशिक शहराच्या सर्वदूर भागात पाईपबंद घरगुती गॅस पुरवठा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.