Bawankule
Bawankule Tendernama
विदर्भ

Devendra Fadnavis : शनिशिंगणापुरातील शनेश्वर देवस्थानच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार 

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये होत असलेल्या कोट्यवधींचा भ्रष्टाचाराची चौकशी सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केली जाणार असून, श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम 2018 ची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शनिशिंगणापूर येथील श्री शनेश्वर संस्थान येथे विश्वस्त मंडळाच्या परवानगीने कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा प्रकार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेत मांडला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे, तसेच सभागृहात पारित झालेल्या कायद्याची अंमलबजावणी करू, अशी माहिती दिली. 

शनि शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थानमध्ये विश्वस्त मंडळाने अनधिकृतपणे 1800 कामगारांची भरती केली. ही संख्या गरजेपेक्षा कितीतरी पट जास्त असून यातील शेकडो  कामगारांना घरी बसून पगार दिला जात आहे. मंदिराच्या चौथाऱ्यावर दर्शनासाठी 500 रुपयांची बनावट पावती छापून 2 कोटी रुपये उकळण्यात आले.

देवस्थानला मिळालेले दान एका खासगी शिक्षण संस्थेला देण्यात येत आहे. 24 तास वीज पुरवठा असताना महिन्याला 40 लाख रुपयांचे डिजेल जाळण्यात आले. मंदिराच्या सुशोभिकरणासाठी 20 कोटींचा निधी देण्यात आला होता, तथापि, 50 कोटी खर्च करूनही अद्यापही 50 ते 60 टक्के काम शिल्लक असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. 

2018 मध्ये भाजप सरकारने श्री शनेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त व्यवस्था अधिनियम 2018 हा कायदा दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर केला होता. त्याची तातडीने अमलबजावणी करावी अशी विनंती बावनकुळे यांनी सभागृहात केली. यावर फडणवीस यांनी सचिव दर्जाचा अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी करण्याचे, संस्थांच्या सर्व व्यवहारांचे ऑडिट करण्याचे व लवकरात लवकर शनेश्वर देवस्थान विश्वस्त अधिनियम 2018 ची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.