नागपूर (Nagpur) : महापालिकेच्यावतीने रस्त्यांचे काँक्रिटीकरण केल्यानंतर तयार करण्यात आलेले फुटपाथ दबले आहेत. या सर्व ठेकेदारांची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरून लागली आहे. अनेक नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना पत्र देऊन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे स्थानिक ठेकेदार चांगलेच धास्तावले आहेत.
शहरातील फूटपाथवर दुकाने, खाजगी शिकवणी वर्गाची पार्किंग आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सजवळ ड्रेनेज लाईनवरच फूटपाथ असून सहा फूट खोल खड्डा असल्याने लक्ष नसल्यास एखादा व्यक्ती त्यात पडण्याची शक्यता आहे. फूटपाथच्या उंचीबाबतच्या मार्गदर्शक तत्वाकडे दुर्लक्ष झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरातील फूटपाथचा बोजवारा उडाला असून दुकानदारांनीच अतिक्रमण केले नसून महावितरण, एसएनडीएलनेही डीपी फूटपाथवरच उभारले आहे. किंबहुना फूटपाथ तयार करताना महापालिका व महावितरणमध्ये समन्वयच नसल्याने विद्युत डीपी, खांब पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरले आहे. भोले पेट्रोलपंप ते विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर एका बाजूने महापालिकेने फूटपाथवरच सौंदर्यीकरण केले आहे. एकीकडे नागरिकांसाठी फूटपाथ सोडायचे अन् त्यावरच सौंदर्यीकरण करायचे, अशी महापालिकेची दुटप्पी भूमिका दिसून येत आहे. अनेक फूटपाथ चालण्याच्या लायकीचेच राहिले नाहीत. विशेष म्हणजे नव्या सिमेंट रस्त्यांची उंची वाढल्याने फूटपाथ गायब झाल्याची नवी समस्या उभी ठाकली आहे. सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण झाली.
आता या रस्त्यांच्या बाजूला 'रोड शोल्डर', फूटपाथ, पावसाळी पाणी वाहून जाणाऱ्या नाल्या तयार करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु सिमेंट रस्ते पूर्ण होऊनही महापालिकेने अद्यापही रस्त्याला समांतर झालेल्या फूटपाथला हात लावला नाही. कंत्राटदारांकडून पूर्ण झालेला सिमेंट रस्ता फूटपाथपर्यंत आयब्लॉकने जोडण्यात आला. अनेक ठिकाणी रस्ता व फूटपाथ सारख्याच उंचीचे झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक आता फूटपाथलाही रस्ता समजून त्यावरून वाहने चालवित आहेत. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी पुन्हा रस्त्यांचाच आधार घ्यावा लागत असून मोठ्या अपघाताला आमंत्रण देण्यात येत आहे.