नागपूर (Nagpur) : मेडिकल आणि मेयो या रुग्णालयांच्या विकासकामांसाठी शासनाने एक हजार कोटींचा निधी दिला होता. त्यामुळे या ठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेडिकलला भेट देत तासभर एपीआय सभागृहात चर्चा केली.
विकासकामांचे प्रकल्प कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वॅार रूम’ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मेडिकल आणि मेयोतील कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागास इतर कंत्राटदारांना दम देत विकासकामे कालमर्यादेत पूर्ण करण्यास सांगितले. सध्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर भविष्यातील प्रकल्पासंदर्भातील माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार आशीष देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ अजय चंदनवाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे उपस्थित होते.
मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये आणि मेयोचे अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी अद्ययावत प्रकल्पाची माहिती दिली. मेयो, मेडिकल येथील सुरू असलेली कामे दिशानिर्देशानंतर किती पूर्ण झाली, याचा आढावा एप्रिल महिन्यात पुन्हा घेण्यात येणार आहे, असे सांगत १५ एप्रिल रोजी पुन्हा मेडिकलमध्ये येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्याकडून कामे रखडल्याची माहिती पुढे आली. कंत्राटदाराचे नाव सांगताच, फडणवीस यांनी थेट कंत्राटदारालाच कामे लवकर करण्याची सूचना दिली. त्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांची स्वच्छतेवर नाराजी
मेडिकल, मेयोमध्ये अधिकाधिक वृक्ष लावण्यावर भर द्यावा असे सांगतानाच मेयो, मेडिकलमधील स्वच्छतेसाठी एजन्सी नेमली आहेत, परंतु एजन्सीचे कर्मचारी नीट स्वच्छतेची कामे करतात नाही, यावर देखरेख ठेवावी अशी सूचना करीत मेडिकल, मेयोत इमारतींच्या प्रसाधनगृहांची देखभाल योग्य प्रकारे व्हावी, अशी सूचना केली. ही सूचना करताना दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वच्छतेवर नाराजी व्यक्त केली.
सौरऊर्जेवर भर द्या
मेयो, मेडिकल यांना लागणाऱ्या विजेची गरज मोठी आहे. दरवर्षी मेयोमध्ये वर्षाला तीस तर मेडिकलमध्ये पन्नास लाखापेक्षा अधिक बिलाचा भरणा करावा लागत असल्याची माहिती पुढे आल्यामुळे दोन्ही रुग्णालयांची सौरऊर्जेवर भर द्यावा. तसेच दोन्ही रुग्णालयात संपूर्ण कॅम्पस परिसर सौर ऊर्जेवर असावा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.