नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकभोवती रिंगरोडला मंजुरी देण्यात आली असून, त्याच्या बांधकामासाठीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यानंतर आता त्र्यंबकेश्वर येथेही जव्हार बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
सिंहस्थ काळात वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून त्यात नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरून प्रयागतीर्थ शेजारून ते जव्हाररोडवरील गणपतबारीच्या अलीकडील गट क्रमाक ८४ पर्यंत जव्हार बाह्यवळण रस्ता प्रस्तावित केला आहे. या रस्त्याचे काम सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या दृष्टीने या ३० मीटर रुंदीच्या या बाह्यवळण मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे.
हा बाह्यवळण रस्ता साधारणपणे तीन किलोमीटर असून त्यासाठी ८७ हजार ५७० चौरसमीटर क्षेत्राचे भूसंपादन करण्याची नोटीस जिल्हा प्रशासनाने संबंधित जमीनधारकांना दिली आहे. या रस्त्यासाठी भूसंपादनासह साधारणपणे ७१ कोटी रुपये खर्च होणार असल्याचे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात नमूद केले आहे.
त्र्यंबकेश्वरच्या जव्हार फाट्यावर नाशिक ते त्र्यंबकेश्वर व जव्हार ते त्र्यंबकेश्वर हे दोन रस्ते मिळतात. त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असल्यामुळे तसेच येथे संत निवृत्तीनाथ महाराज समाधी असल्याने वर्षभर वेगवेगळ्या पर्वकाळानिमित्ताने भाविकांची मोठी वर्दळ असते. यामुळे जव्हारफाटा येथे कायम वाहतूक कोंडी होत असते.
त्यातच पालघर जिल्ह्यात प्रस्तावित केलेल्या वाढवण बंदराकडे नाशिकमार्गे जाणारी वाहतूक याच मार्गावरून जाणार आहे. यामुळे भविष्यातील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन नाशिकहुन जव्हार, डहाणू अथवा वाढवण बंदराकडे जाणारी वाहने त्र्यंबकेश्वरमध्ये न येता ती परस्पर जव्हाररोडवरून जावीत, यासाठी त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात या जव्हार बाह्यवळण रस्त्याचा समावेश करण्यात आला आहे.
या आराखड्यानुसार हा रस्ता ३० मीटर रुंदीचा असून त्याची लांबी साधारणपणे ३१५० मीटर आहे. या रस्त्यासाठी ९४ हजार ५०० चौरसमीटर क्षेत्र लागणार आहे. त्यातील ८७ हजार ५७० चौरसमीटर क्षेत्राचे भूसंपादन करण्याची नोटीस जिल्हा प्रशासनाने बजावली आहे. या रस्त्यासाठी लागणा-या जागेच्या संपादनासाठी साधारणपणे १३ कोटी २३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच हा ३० मीटर रुंदीचा रस्ता उभारण्यासाठी ५८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
हा रस्ता त्र्यंबकेश्वर पालिकेच्या विस्तारित भागालगत जाणार असून बीनशेती व शेतीयोग्य जमिनीच्या हद्दीवरून हा बाह्यवळण रस्त्याचा आराखडा त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने तयार करून भूसंपादनाची काही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली आहे. या बाह्यवळण रस्त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर व त्र्यंबकेश्वर-जव्हार या मार्गाच्या उत्तर बाजूचा विकास वेगाने होऊ शकणार आहे.
सिंहस्थाच्या निमित्ताने याच भागात गोदावरीच्या दोन्ही तिरांवर घाट उभारण्याचे नियोजन असून याच भागामध्ये साधुग्राम उभारण्यासाठी जमीनधारकांना अधिग्रहणाच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत.
काम एमएसआयडीसीकडे
त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांना राज्याच्या पर्यटन विभागाने मंजुरी दिला असून त्यात त्र्यंबकेश्वर दर्शनपथ, डीपी रोड, मंदिर, कुंड यांचे पुनरुज्जीवन, स्वच्छतागृह ही कामे केली जाणार आहेत. त्यातील दर्शन पथ व डीपी. रोड यांची कामे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ करणार आहे.
यामुळे या जव्हार बाह्यवळण रस्त्याचे बांधकाम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून केले जाणार असल्याचे दिसत आहे.