Trimbakeshwar Tendernama
उत्तर महाराष्ट्र

त्र्यंबकेश्वरमध्ये 5 कोटींचे सभागृह पाडून बांधणार 51 कोटींची इमारत

दर्शन पथाच्या उभारणीमध्ये प्रसाद योजनेतून उभारलेले सभागृह ठरतेय अडथळा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): त्र्यंबकेश्वर म्हटले की नारायण नागबली विधी समोर येतो. देशात केवळ त्र्यंबकेश्वर येथेच हा विधी होतो, याचा प्रचारही भरपूर झाल्याने येथे वर्षभर त्या विधीसाठी भाविकांची वर्दळ असते. त्र्यंबकेश्वर या गावाचे अर्थकारण या विधीवरच अवलंबून असल्याने व येथे देशभरातील भाविक येत असल्याने भाविकांसाठी सोईसुविधा उभारण्यासाठी सरकार निधी देत असते.

असेच काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेच्या निधीतून नारायण नागबली विधीसाठी ५ कोटी रुपये खर्चून उभारलेले सभागृह दर्शनपथ उभारण्यात अडथळा ठरणार असल्याने ते पाडले जाणार आहे. विशेष म्हणजे दर्शनपथ उभारताना याच ठिकाणी नारायण नागबली विधीसाठी नवीन इमारत उभारला जाणार असून कुंभमेळा प्राधिकरणाने त्यासाठी ५१ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

त्र्यंबकेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक प्रमुख ठिकाण असून तेथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. यामुळे येथे देशभरातील भाविकांची वर्षभर वर्दळ असते. या ठिकाणी नारायण नागबली, त्रिपिंडी हे पितृदोषासंबंधी विधी करण्यासाठी भाविक येत असतात.

या विधींसाठी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पूर्वेला गोदावरीकाठी जागा आहे. या ठिकाणी पूर्वी एक पत्र्याचे शेड उभारून विधीसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र, त्यात भाविकांची गैरसोय होत असल्याने केंद्र सरकारच्या तीर्थक्षेत्र विकासासंबंधी असलेल्या प्रसाद योजनेतून यासाठी एक भव्य सभागृह बांधण्यात आले होते.

प्रसाद योजनेतून त्र्यंबकेश्वरमध्ये ३८ कोटी रुपयांची कामे करण्यात आली. त्यात प्रामुख्याने संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर विकास, ब्रह्मगिरी, अंजनेरी प्रदक्षिणा मार्गावर सुविधा, पर्यटक सुविधा केंद्र व अहल्या-गोदावरी संगमावर तीर्थयात्री सुविधा केंद्र उभारण्यात आले होते.

तीर्थयात्री सुविधा केंद्र म्हणजेच नारायण नागबली विधी करणा-या भाविकांसाठी उभारलेले सभागृह. या सभागृहासाठी साधारणतः पाच कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या सभागृहामुळे नारायण नागबळी विधीसाठी येणा-या भाविकांचे ऊन, पाऊस, थंडीपासून संरक्षण होत असते.

दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी करण्यात आलेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात उज्जैनप्रमाणेच त्र्यंबकेश्वर येथेही दर्शनपथ उभारण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला. त्यासाठी साधारण ६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, कुंभमेळा प्राधिकरणने हा दर्शनपथ अपुरा असल्याने त्याचा विस्तार करून तेथे भाविकांना अधिकाधिक सोईसुविधा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ३९० कोटी रुपयांचा आराखडा तयार करून त्याला मंजुरी देण्यात आली.

या विस्तारित दर्शनपथाच्या उभारणीसाठी शहराच्या प्रवेशद्वारालगतचे पंचायत समिती कार्यालय, पशुसंवर्धन दवाखाना, उपजिल्हा रुग्णालयतहसील कार्यालय व शिवनेरी धर्मशाळा पाडण्यात येणार आहे. या विस्तारित दर्शनपथामध्ये गोदावरी अहल्या संगमावरील घाटांचे सुशोभीकरण केले जाणार असून तेथील नवीन घाटांवरून थेट त्र्यंबकेश्वर मंदिराकडे भाविकांना जाता येईल, असा कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे. मात्र, त्यात प्रसाद योजनेतून उभारलेले सभागृह अडथळा ठरत आहे.

यामुळे हे नारायण नागबळीसाठी तयार करण्यात आलेले सभागृह पाडून त्याच परिसरात नारायण नागबळीसाठी भाविकांना विधी इमारत उभारण्यास कुंभमेळा प्राधिकरणने आराखड्यात ५१ कोटींची तरतूद केली आहे. प्रसाद योजनेतून नारायण नागबळीसाठी भाविकांना सुविधा उभारताना केवळ मोकळ्या जागेवर सभागृह उभारण्यात आले. त्यावेळी भविष्यातील गरजांचा विचार केला असता, तर आज ही इमारत पाडण्याची वेळ आली नसती व सरकारी तिजोरीतील निधीही वाया गेला नसता, असे बोलले जात आहे