simhastha maha Kumbh Nashik, sadhugram Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Sadhugram Nashik: 191 एकर भूसंपादनासाठी 2267 कोटी रुपये निधी वितरणाला मान्यता

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील साधुग्रामसाठी १९१.२१ एकर जमीन संपादनाला राज्य शासनाने २,२६७ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांवर वेळेत ताबा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याने साधू- महंतांच्या निवासासाठीच्या ग्राम उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या भूसंपादनासाठी निधी देण्याला मंत्रीमंडळ समितीने यापूर्वीच एप्रिलमध्ये मान्यता दिला होती. त्यानंतर आता हा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, नगरविकास विभागाने २८३ एकर क्षेत्राऐवजी केवळ १९१ एकर क्षेत्राच्या भूसंपादनासाठी निधी दिल्याने उर्वरित ९२ एकर भूसंपादनाचे काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिक येथे दर बारा वर्षांनी होत असलेल्या सिंहस्थ काळात साधुग्राम उभारण्यासाठी नाशिक महापालिकेने तपोवन परिसरात साधुग्रामचे ३७७ एकर क्षेत्रावर आरक्षण टाकलेले आहे. त्यातील ९४ एकर क्षेत्र महापालिकेने यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. उर्वरति २८३ एकर क्षेत्र मागील म्हणजे २०१५ च्या सिंहस्थात वर्षभरासाठी भाडेतत्वावर घेतले होते.

सिंहस्थानंतर ती जागा पुन्हा जमीन मालकांना देण्यात आली. साधुग्रामसाठी त्यावर रस्ते व इतर पायाभूत सुविधा उभारल्या जातात. यामुळे जमीन मालकांना ही जमीन परत करताना ती कसण्या योग्य राहत नाही. यामुळे साधुग्रामसाठी आरक्षित केलेली जमीन कायमस्वरुपी ताब्यात घ्यावी, अशी मागणी या जमीन मालकांकडून केली जात होती.

दरम्यान २०२७ च्या सिंहस्थाच्या दृष्टीने साधू-महंतांच्या निवासासाठी साधुग्रामचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्याची योजना प्रशासनाने आखली आहे. एकूण विकास क्षेत्र सुमारे १,४५० एकरांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव असून त्यापैकी सुमारे १,१५० एकर जमीन तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित केली जाणार आहे. कुंभमेळ्यात यावेळी साधूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही योजना आखण्यात आली आहे.

त्यात आरक्षण टाकलेल्या ३७७ एकर क्षेत्रापैकी उर्वरित २८३ एकर क्षेत्र कायमस्वरुपी ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने भूसंपादनाचा प्रस्ताव तयार केला होता. त्या प्रस्तावानुसार निम्मा मोबदला रोख स्वरुपात व निम्मा मोबदला टीडीआर स्वरुपात दिला जाणार होता. मात्र, जमीन मालकांनी हा प्रस्ताव नाकारला. यामुळे हे भूसंपादन होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता.

दरम्यान नाशिक महापालिकेने १२ डिसेंबर २०२५ रोजी साधुग्रामच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारकडे २५१४ कोटी रुपयांची मागणी करणारा ठराव केला होता व कुंभमेळा प्राधिकरणच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवला होता. दरम्यान नाशिक महापालिकेने फेब्रुवारी २०२६ मध्ये पुन्हा नव्याने २५१४ कोटी रुपयांच्या मागणी केलेल्या निधीतून यापूर्वी भूसंपादन केलेल्या रस्त्यांसाठीचा २५० कोटींचा मोबदला वगळून २२६४ कोटी रुपये निधी व प्रशासकीय खर्च तीन कोटी रुपये असा २२६७ कोटी रुपये निधी साधुग्रामच्या भूसंपादनासाठी मागणी करणारा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठवला. त्यानुसार राज्य सरकारने २२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ समितीच्या बैठकित १९१.२१ एकर क्षेत्राच्या भूसंपादनासाठी २२६७ कोटी रुपये मंजूर करण्यास मान्यता दिली होती.

त्यानंतर आता नगरविकास विभागाने शासननिर्णयाद्वारे साधुग्रामच्या भूसंपादनासाठी २२६७ कोटी रुपये निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. नगरविकास विभागाचे उपसचिव अजिंक्य बगाडे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी साधू- महंतांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यासाठी ही जागा संपादित केली जात आहे. प्रयागराजच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर जागेची गरज भासणार आहे.

सिंहस्थात सुमारे ५ लाख साधू- महंत येण्याचा अंदाज असून, त्यासाठी साधुग्रामचा विस्तार आवश्यक आहे. नाशिक विकास योजना २०१७ नुसार साधुग्रामसाठी ३७७ एकर राखीव होती. त्यापैकी ९४ एकर आधीच संपादित झाली आहे. उर्वरित २८३ एकर संपादित करण्याची प्रक्रिया सुरू असून, सध्या १९१.२१ एकरसाठी निधी मंजूर झाला आहे. यामुळे उर्वरित ९२ एकर क्षेत्राच्या संपादनाचे काय, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

नगर विकास विभागाने साधुग्रामच्या भूसंपादनासाठी २२६७ कोटी रुपये निधी वितरणास मान्यता दिल्यानंतर जमिनीचे वेळेवर संपादन व ताबा घेण्याची संयुक्त जबाबदारी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्यावर सोपवली आहे. मोबदला आरटीजीएस द्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. मंजूर निधी फक्त साधुग्रामच्या जमीन संपादनासाठीच वापरता येणार आहे.या निर्णयामुळे सिंहस्थापूर्वी साधुग्रामच्या उभारणीला गती मिळणार आहे.

तपोवनातील साधुग्राम भुसंपादन

साधुग्रामसाठी आरक्षित क्षेत्र : ३७७ एकर
यापूर्वी संपादित केलेल क्षेत्र : ९४ एकर
साधुग्रामसाठी भूसंपादन होणार : १९१.२१ एकर
भूसंपादनासाठी निधी मंजूर : २,२६७ कोटी रुपये