Reliance
Reliance Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये रिलायन्सच्या फार्मा कंपनीची ४२०० कोटींची गुंतवणूक

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : रिलायन्स उद्योग समूहाच्या रिलायन्स लाईफ सायन्सेस या उपकंपनीच्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरील ४२०० कोटींच्या गुंतवणुकीत राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीने मान्यता दिली आहे. या उपसमितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून त्यांनी राज्यातील ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.

रिलायन्स लाईफ सायन्सेस या कंपनीकडून दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये यापूर्वीच २५०० कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. त्यात वाढ होऊन ती गुंतवणूक आता ४२०० कोटींवर पोहोचली आहे. या गुंतवणुकीमुळे नाशिकमध्ये थेट साडेतीन हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.

नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात रिलायन्स व इंडियन ऑईल या दोन कंपन्यांनी आतापर्यंत गुंतवणुकीची तयारी दर्शवली आहे. रिलायन्स उद्योग समूहाच्या रिलायन्स लाईफ सायन्सेस या फार्म कंपनीला यापूर्वीच अडीच हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १६१ एकर जमिन दिली आहे. या जमिनीवर सध्या प्रकल्प उभारणीचे काम सुरू झाले आहे. प्रकल्प साकारत असतानाच रिलायन्स लाईफ सायन्सेसने अक्राळे औद्योगिक वसाहतीमधील गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय घेतला असून तसे त्यांनी सरकारला कळवले.

यामुळे या वाढीव गुंतवणुकीसह ४२०० कोटींच्या गुंतवणुकीला राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीने मान्यता दिली आहे. अक्राळे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये १६१ एकर जागेत रिलायन्सकडून प्लाझ्मा, प्रोटिन्स औषधे व लसींची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे या उद्योगामुळे साडेतीन हजार लोकांना थेट रोजगार मिळणार आहे व अप्रत्यक्ष सात हजार लोकांना रोजगार मिळू शकणार आहे. फार्मा क्षेत्रातील मोठी कंपनी नाशिकमध्ये येणार असल्यामुळे अक्राळे परिसरात भविष्यात फार्मा उद्योगाला चांगली चालना मिळू शकणार आहे. रिलायन्स सायन्सेस ही रिलायन्स उद्योग समूहाची उपकंपनी नवी मुंबईत असून त्यांच्या विस्तारासाठी तेथील २५ एकर जागा कमी पडत असल्यामुळे त्यांनी दिंडोरी तालुक्यातील अक्राळे औद्योगिक वसाहतीची निवड केली आहे. यामुळे नाशिकला अनेक वर्षांनी मोठा उद्योग येणार असून फार्मा उद्योगाच्या वाढीला चालना मिळणार आहे.