Nashik ZP
Nashik ZP Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik ZP: अधिकाऱ्यांना सांगता येईना जलजीवन योजनेचा खर्च

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेच्या (ZP) ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून जलजीवन मिशनच्या (Jal Jeevan Mission) १,२२२ योजनांची जवळपास १,४४३ कोटींची कामे सुरू आहेत. योजना तयार करण्यापासून ते योजनेची अंमलबजावणी सुरू असताना यातील अनेक त्रुटी उघडकीस येत असून, या योजनेच्या यशाबाबत स्थानिक पातळीवर संशय व्यक्त केला जात आहे.

यापार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घेतलेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत त्यांनी जलजीवन मिशनच्या कामांबाबत माहिती घेताना या योजनेवर आतापर्यंत किती निधी खर्च केला, याची माहिती विचारली. यावर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता व मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांना माहिती देता आली नाही.

यामुळे संतप्त झालेल्या डॉ. पवार यांनी अधिकाऱ्यांची हजेरी घेतली. तसेच कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांचा कार्यभार काढून घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या. डॉ. भारती पवार यांनी जिल्हा परिषदेत यापूर्वी असे कामकाज कधीही झाले नसल्याची सांगत नाराजी व्यक्त ही केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) बैठकीत प्रामुख्याने जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून राबवल्या जात असलेल्या जलजीवन मिशनच्या योजनांबाबत चर्चा झाली.

जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांसाठी किती निधी प्राप्त झाला आहे, अशी विचारणा डॉ. पवार यांनी केली. त्यावर प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी १४०० कोटींचा निधी प्राप्त झाल्याचे सांगितले. मात्र, यापैकी किती निधी खर्च झाला याबाबत सोनवणे यांना उत्तर देता आले नाही. त्यावर डॉ. पवार यांनी सोनवणे यांना खडेबोल सुनावत चांगलीच खरडपट्टी काढली.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कामकाजाबाबत अनेक तक्रारी असल्याचे देखील डॉ. पवार यांनी बोलावून दाखविले. या विभागासाठी प्रशासनाने स्वतंत्र कार्यकारी अभियंता यांची मागणी का केली नाही? पाणी हा जिव्हाळाचा विषय असताना त्यांचा कार्यभार हा प्रभारीकडे कसा, असा सवाल देखील त्यांनी केला. यातच बांधकाम विभाग दोनचा पदभार देखील त्यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सांगितले असता डॉ. पवार चांगल्याच संतापल्या.

पदभार देण्यासाठी केवळ सोनवणेंच आहेत का, असा प्रश्न त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारला. तसेच सोनवणे यांच्याकडून पदभार काढून स्वतंत्र कार्यकारी अभियंता यांच्याकडे देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केली.

विशेष म्हणजे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून संदीप सोनवणे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता असताना त्यांना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा प्रभार देणे चुकीचे असल्याचे निदर्शनास आणून दिले होते व त्यांचा प्रभार काढण्याची मागणी केली होती. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या पत्राला काहीही महत्व दिले नाही.

आता केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या सूचनेबाबत त्या काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे. संदीप सोनवणे हे पालकमंत्री दादा भुसे यांच्या जवळचे अधिकारी असल्याचे बोलले जाते, यामुळे जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता आहे.