Nashik ZP CEO
Nashik ZP CEO Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्हा परिषद उभारणार १०० आदर्श शाळा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जिल्हा परिषदेतर्फे चालवण्यात येणाऱ्या ३२८६ शाळांपैकी १०० आदर्श शाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी नियोजन समितीने मान्यता दिली असून या १०० शाळांमध्ये विद्यार्थांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी पायाभूत व अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी दिली.

जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात ३२८६ प्राथमिक शाळा चालवल्या जातात. या शाळांमध्ये प्रामुख्याने शेतकरी, शेतमजूर यांची मुले शिक्षण घेतात. अलीकडच्या काही वर्षांमध्ये या शाळांचा दर्जा सुधारल्याने पट संख्या वाढण्यास मदत होत आहे. या शाळांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा व शिक्षणाच्या अत्याधुनिक सुविधा उभारल्यास या शाळा खासगी शाळांपेक्षा चांगल्या होतील, या विचाराने पालकमंत्री दादा भुसे यांनी मागच्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत १०० आदर्श शाळा बनवण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनास केल्या होत्या. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी प्राथमिक शिक्षण विभागाकडून १०० आदर्श शाळांचा आराखडा तयार करून घेतला.एकट्या शिक्षण विभागाकडे असलेल्या निधीतून आदर्श शाळा निर्मिती करणे शक्य नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या समन्वयातून निधी उपलब्ध करून कामे केली जाणार आहेत.

रोजगार हमी योजनेतून शाळेला संरक्षक भिंत, क्रीडांगण, स्वच्छता गृह आदी १५ प्रकारची कामे केली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रक्रिया अधिक सोपी व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जाणार असून त्यासाठी  जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून प्रत्येक १० मुलांमागे एक याप्रमाणे टॅब उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच इंटरनेट जोडणी, डिजिटल बोर्ड, वर्चुअल रिऍलिटी सिस्टीम, स्मार्ट टीव्ही, संगणक प्रयोगशाळा आदी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी शाळेच्या प्रांगणात परसबाग उभारली जाईल. या आदर्श शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा विभागाच्या माध्यमातून क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी कला दालन उभारले जाईल तसेच स्वतंत्र योगवर्ग उभारले जाणार आहेत. शिक्षकांना गणवेश बंधनकारक असून शाळांच्या भिंतीवर शिक्षणास पूरक असे चित्र, रंगकाम केले जाणार आहे.

प्रत्येक शाळेत विज्ञान प्रयोग शाळा उभारली जाणार असून शक्य असेल तेथे रोबोटिक्स प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेत उपक्रमांची दिनदर्शिका तयार केली जाईल, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आदर्श शाळा केवळ देखण्या इमारतीपुरती मर्यादित नसून तेथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली जाणार आहे. तसेच नव्या युगाची शैक्षणिक साहित्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या आदर्श शाळांमध्ये उपलब्ध होणार आहे. दरवर्षी नवीन १०० शाळा या योजनेतून आदर्श केल्या जाणार आहेत. यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा व शिक्षण या दोन्हीही बाबी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांनी स्पष्ट केले.