E Charging Station
E Charging Station Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : वर्षभरापासून का रखडलेय इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे टेंडर?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरणांतर्गत नाशिक महापालिकेच्या माध्यमातून शहरात मंजूर १०६ चार्जिंग स्टेशनची उभारणी संथ कारभारामुळे अडकली आहे. पहिल्या टप्प्यात शहरात २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीची टेंडर प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून वर्षापासून सुरू आहे. विद्युत विभागाकडून या २० चार्जिंग स्टेशनसाठी चार वेळा टेंडर प्रसिद्ध केले आहे. मात्र, वारंवार या टेंडरमधील अटी व शर्तीत बदल केला जात असल्याने राष्ट्रीय स्तरावरील कंपन्या सहभागासाठी तयार होत नाहीत. राष्ट्रीय स्वच्छ  हवा कार्यक्रमाचा निधी खर्च न झाल्यास परत जाण्याची शक्यता असल्याने या चार्जिंग स्टेशन्सची उभारणी वेळेत न झाल्यास त्यासाठी तरतूद केलेले १० कोटी रुपये परत जाण्याची भीती आहे.
 

नाशिक महापालिकेने स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग स्टेशनचा उभारण्याचा या वर्षाच्या प्रारंभी जानेवारीत महत्त्वाचा निर्णय घेतला. केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाअंतर्गत शहरात १०६ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे जाहीर करण्यात आले. यात पहिल्या टप्प्यात ५७ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार असल्याचीही घोषणा झाली.

त्यानुसार नवी दिल्लीच्या युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) अंतर्गत २२, तर एन कॅप अर्थातच नॅशनल क्लिनर पॉलिसीअंतर्गत ३५ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असल्याचेही जाहीर केले.

दरम्यान पहिल्या टप्प्यात एन-कॅप योजनेतून शहरात २० ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवण्याचा निर्णय झाला. या चार्जिंग स्टेशन्ससाठी राबवण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत महापालिकेकडून वारंवार अटीशर्तींमध्ये बदल केल्यामुळे टेंडर प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने आतापर्यंत तीनवेळा टेंडर प्रसिद्ध करावे लागले आहेत.

टेंडरच्या अटीशर्तीमध्ये कार्यारंभ आदेशानंतर चार महिन्यांच्या आत चार्जिंग स्टेशनची उभारणी व चार चाकी वाहनांसाठी ६० केव्ही व दुचाकी, तीनचाकी वाहनांसाठी ३.३ केव्ही क्षमतेचे चार्जर बसवणे बंधनकारक करण्यात आल्याचे नमूद होते.

प्रत्यक्षात टेंडर राबवण्याचा कालवधीच जवळपास वर्षाचा होत आला आहे. यामुळे या अटीशर्तींना काही अर्थ उरला नसल्याचे दिसत आहे. तरीही अनेक नामांकित कंपन्या या टेंडर प्रक्रियेत सहभागी होत असल्या तरी वेगवेगळ्या कारणांनी टेंडर पूर्ण होत नसल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या संथ कारभारामुळे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणीला मुहूर्त लागत नसल्याचे चित्र आहे.

या ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन्स...
राजीव गांधी भवन (महापालिका मुख्यालय), महापालिका पश्चिम विभागीय कार्यालय, महापालिका पूर्व विभागीय कार्यालय, महापालिका नाशिकरोड विभागीय कार्यालय, महापालिका सातपूर विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, सिडको विभागीय कार्यालय, तपोवन बस डेपो, फायर स्टेशन पंचवटी, सातपूर फायर स्टेशन, राजे संभाजी स्टेडियम सिडको, बिटको हॉस्पीटल, कृषिनगर जॉगिंग ट्रॅक, बी. डी. भालेकर मैदान, प्रमोद महाजन उद्यान, महात्मा नगर क्रिकेट मैदान, दादासाहेब फाळके स्मारक, गणेशवाडी भाजी बाजार इमारत, लेखानगर मनपा जागा, महापालिका मैदान, अंबड लिंकरोड.