MIDC
MIDC Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : अक्राळे एमआयडीसीतील 27 भूखंडांसाठीच्या लिलावाला का मिळाला मोठा प्रतिसाद?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) नाशिक प्रादेशिक कार्यालयाने दिंडोरी तालुक्यातील अक्राळे औद्योगिक वसाहतीतील २७ भूखंड लिलावाद्वारे विक्रीस उपलब्ध आहेत. या विक्रीस उद्योजकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, अवघ्या २७ भूखंडांसाठी तब्बल १९७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एमआयडीने या भूखंडांचा दर प्रतिचौरस मीटरला तीन हजार रुपये ठेवला असला, तरी प्रत्यक्षात लिलावात हे दर पाच हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नाशिकपासून अवघ्या १२ किलोमीटरवर दिंडोरी तालुक्यात तळेगाव - अक्राळे औद्योगिक वसाहत उभारण्यात येत आहे. यासाठी भूसंपादन व भूखंड विकसित करण्यासाठी एमआयडीसीने ४५० कोटींहून अधिक खर्च केले आहेत. सद्यस्थितीत या वसाहतीत रस्ते, पथदिवे व पाण्याची सुविधा आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे रिलायन्सने तब्बल ४,२०० कोटींची गुंतवणूक या ठिकाणी केली आहे. याशिवाय इंडियन ऑइलसह इतर २९ उद्योग या ठिकाणी आलेले आहेत.

यामुळे जिल्ह्यात सध्या अक्राळे एमआयडीसीत भूखंड घेण्यासाठी उद्योजकांचा ओढा वाढला आहे. प्रारंभी अक्राळेतील भूखंड विक्रीच्या तीन वेळा जाहिराती प्रसिद्ध केल्या गेल्या. मात्र, दर अधिक असल्याने उद्योजकांनी त्यास फारसा प्रतिसाद दिला नाही. तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडेदेखील दर कमी करण्याबाबत उद्योजकांनी मागणी केली होती.

दरम्यान, २०२० मधील दरानेच सध्या भूखंड विक्री करण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. दर स्थीर राहिल्याने पूर्वी अधिक वाटणारे दर आता वाजवी वाटत आहेत. याशिवाय औद्योगिक वसाहतीत मोठमोठे उद्योग आल्याने, अक्राळे औद्योगिक वसाहतीचे महत्त्व वाढल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अधिकृत संकेतस्थळावर २७ भूखंडांची जाहिरात प्रसिद्ध करताना तीन हजार रुपये प्रतिचौरस मीटर हा दर निश्चित केला आहे. लिलाव पद्धतीने या भूखंडांचे वितरण होणार असल्याने लिलावात हे दर पाच हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सरासरी एका भूखंडासाठी सात उद्योजकांचे अर्ज आल्याने दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या २७ भूखंडांपैकी १२ भूखंड अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी आरक्षित असणार आहेत.

एमआयडीसीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार ३०००, ११२५, १००० चौरस मीटर आकाराचे २७ भूखंड विक्रीस उपलब्ध आहेत. तसेच या भूखंडांचा दर तीन हजार रुपये प्रती चौरस मीटर आकारण्यात आला आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे. आता लवकरच लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.