Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: नाशिककरांसाठी गुड न्यूज! सिंहस्थापूर्वीच फुटणार प्रमुख 12 चौकांतील वाहतूक कोंडी

महापालिकेने सादर केला चौकांच्या विस्तारीकरणाचा आराखडा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिका हद्दीत नाशिक पुणे महामार्ग व मुंबई आग्रा महामार्ग यांच्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नाशिक महापालिकेने 12 चौकांमध्ये अंडरपास व उड्डाणपूल प्रस्तावित केले आहेत.

सिंहस्थ कुंभमेळा काळात येणारी वाहने लक्षात घेऊन शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होत असलेल्या द्वारका चौकाचाही यात समावेश आहे. ही कामे सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या निधीतून महाराष्ट्र पायाभूत विकास महामंडळ करणार असल्याने महापालिकेने या चौक विस्तारीकरणाचा आराखडा या महामंडळाकडे सादर केला आहे.

नाशिक शहरातून नाशिक-पुणे, तसेच मुंबई-आग्रा हे दोन प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात. हे दोन महामार्ग एकमेकांना द्वारका चौकात मिळतात. मुंबई आग्रा महामार्गावर पाथर्डी ते हॉटेल जत्रापर्यंत उड्डाणपूल उभारलेला आहे. त्यानंतरही या मार्गावरील चौकांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे आहे.

तशीच परिस्थिती नाशिक पुणे महामार्गावरील चौकांची आहे. या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणने द्वारका चौक ते नाशिकरोड येथील दत्तमंदिर चौक असा उड्डाणपूल प्रस्तावित केला होता. त्यानंतर नाशिकमध्ये निओमेट्रो प्रकल्पाची घोषणा झाली. यामुळे हा उड्डाणपूल दोन मजली करण्याचा प्रस्ताव समोर आला. मात्र, हे दोन्ही प्रकल्प केवळ घोषणेच्या पातळीवर राहिले.

आता तर निओ मेट्रो ऐवजी कॉम्पॅक्ट मेट्रो या नवीन प्रकल्पाची चर्चा सुरू केली आहे. त्यातच आता सिंहस्थ केवळ दीड वर्षावर येऊन ठेपला आहे. या परिस्थितीत नाशिक महापालिका प्रशासन मेट्रो प्रकल्पाच्या स्वप्नातून बाहेर आले असून त्यांनी वास्तववादी भूमिका घेतली आहे.

शहरातील नागरिकांची वाहने, औद्योगिक मालवाहतूक यामुळे प्रमुख मार्ग, चौकांवर क्रॉस ट्रॅफिकमुळे ताण येत आहे. रुग्णवाहिका, अग्निशामक या आपत्कालीन सेवाहीवेळेत पोहोचण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे सिंहस्थापूर्वी ही वाहतूक कोंडी फोडण्याचे मोठे आव्हान लक्षात घेऊन.

महापालिकेने चौक सुधार आराखडा तयार करून तो महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळकडे ( एमएसआयडीसी) सादर केला आहे.

असा आहे चौक सुधार आराखडा

मुंबई-आग्रा महामार्ग

पाथर्डी फाटा

मुंबई नाका

द्वारका चौक

आडगाव नाका

बळी मंदिर चौक

अमृतधाम

जत्रा हॉटेल परिसर

नाशिक-पुणे महामार्ग

काठे गल्ली सिग्नल चौक

विजय-ममता सिग्नल चौक (फेम सिनेमा)

दत्त मंदिर चौक

बिटको चौक

सिन्नर फाटा चौक