

मुंबई (Mumbai): मुंबईच्या पश्चिमेला असलेला अथांग समुद्रकिनारा आणि निसर्गाचे वरदान लाभलेले गोराई हे ठिकाण आता जागतिक पर्यटनाच्या नकाशावर एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येणार आहे.
पर्यटनाच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले असून, गोराई येथील १२८ एकर विस्तीर्ण भूभागाचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ताब्यातील या अवाढव्य जागेचे रूपांतर एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळात करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मेघदूत निवासस्थानी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला.
गोराई हे केवळ मुंबईकरांसाठीच नव्हे, तर जगभरातील पर्यटकांचे आकर्षण ठरावे, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या नियोजित प्रकल्पात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जागतिक दर्जाचे मनोरंजन केंद्र, चित्तथरारक जलक्रीडा प्रकार (वॉटर स्पोर्ट्स), निसर्गरम्य उद्याने आणि आरामदायी निवासस्थाने विकसित केली जाणार आहेत.
हा प्रकल्प साकारताना जागतिक दर्जाशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विकासकांचे सहकार्य घेण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत. सरकारी आणि खासगी भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जाणार असून, त्यासाठी जगभरातील सर्वोत्तम विकासकांना सहभागी करून घेतले जाईल.
गोराईचा विकास करताना केवळ स्थानिक मर्यादेत न राहता गोवा, केरळ आणि मध्य प्रदेश यांसारख्या पर्यटनात अग्रेसर असलेल्या राज्यांमधील यशस्वी प्रयोगांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. तसेच, या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांची नेमणूक करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प आकारास येईल.
या संपूर्ण प्रक्रियेत विकासकामांना वेग देतानाच शासनाचे हक्क आणि अधिकार अबाधित राहतील, याची दक्षता घेण्याची ताकीद मंत्री देसाई यांनी प्रशासनाला दिली आहे. सर्व आवश्यक परवानग्या वेळेत घेऊन आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.
प्रधान सचिव संजय खंदारे, संचालक डॉ. बी. एन. पाटील, व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीमुळे गोराईच्या विकासाला गती मिळाली असून, लवकरच मुंबईच्या पर्यटन वैभवात एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.