नाशिक (Nashik): हवाई दलाच्या सूर्यकिरण पथकाच्या प्रात्यक्षिकांना उपस्थित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तिकीट आकारणी केली होती. यामुळे हवाई दलाच्या विद्यमान व निवृत्त अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत संरक्षण मंत्रालयाकडे तक्रार करण्याची जाहीर भूमिका व्यक्त केली होती.
त्यावर सावरासावर करीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तिकीट विक्रीतून आलेली रक्कम सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणून सैनिक कल्याण निधीला देण्यात येणार असल्याचा खुलासा केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या कार्यक्रमाच्या तिकिट विक्रीतून मिळालेली १ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीचा धनादेश प्रजासत्ताक दिनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 'सशस्त्र सेना ध्वजदिन निधी' करिता सुपूर्द करण्यात आला.
गंगापूर धरण परिसरात २२ व २३ जानेवारी रोजी हवाई दलाच्या सूर्यकिरण हवाई दलातर्फे प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. हवाई दलातर्फे दरवर्षी एका शहरात तरुणांमध्ये सैन्यदलात सामील होण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी विमानांच्या प्रात्याक्षिक सादर केले जाते. तसे प्रात्यक्षिक यावर्षी नाशिकला झाले.
हे प्रात्यक्षिक बघण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून द्यायची असते. नाशिक जिल्हा प्रशासनाने गंगापूर धरण परिसरात या एअर शो प्रात्यक्षिकाचे आयोजन केले. मात्र, त्यासाठी २०० ते १५०० रुपयांपर्यंत तिकीट आकारणी केली. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुक करण्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या.
खरे तर हा कार्यक्रम मोफत ठेवणे अपेक्षित आहे. देशभरात आतापर्यंत आयोजित केलेल्या एकाही कार्यक्रमासाठी तिकीट आकारणी केलेली नसल्याने नाशिक येथे जिल्हा प्रशासनाने केलेली तिकीट आकारणी हवाई दलाच्या विद्यमान व निवृत्त अधिकाऱ्यांना खटकली. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.
काहींनी याबाबत संरक्षण मंत्रालयाकडे तक्रार करण्याचाही इशारा दिला. यामुळे जिल्हाधिकारी यांनी ही तिकीट आकारणी गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी केलेली आहे,असा खुलासा केला. तिकिटांच्या संख्येवरून गर्दीचा अंदाज येईल व त्यानुसार व्यवस्थापन करता येईल, असे जिल्हाधिकारी यांचे म्हणणे होते.
तसेच या तिकीट विक्रीतून जमा झालेली रक्कम' सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणून सैनिक कल्याण विभागाला दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेमुळे हवाई दलातील अधिकाऱ्यांचे समाधान होऊन, याबाबतचा वाद निवळला गेला.
यामुळे जिल्हाधिकारी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सूर्यकिरण हवाई प्रात्यक्षिकांच्या तिकीट विक्रीतून जमा झालेल्या १ कोटी ५६ लाखांच्या निधीचा धनादेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 'सशस्त्र सेना ध्वजदिन निधी' करिता जिल्हा सैनिककल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलास सोनवणे (निवृत्त) यांच्याकडे सुपूर्द केला.
या उपक्रमाच्या आयोजनासंदर्भात मंथन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (ता. २७) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, सूर्यकिरण हवाई प्रात्यक्षिकासारख्या उपक्रमांच्या आयोजनातील अनुभव हा मोलाचा आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसह सुविधा व सुव्यवस्थेला प्रशासनाचे प्राधान्य आहे. हा अनुभव सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या उत्सवांमध्ये उपयोगी येणार आहे.