water supply
water supply Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : 'त्या' 12 किमी जलवाहिनीचे Tender जिंदाल कंपनीला; सिंहस्थापूर्वीच...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : गंगापूर धरणातून बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या बारा किलोमीटर जलवाहिनी कामाचे २०४.३८ कोटींचे टेंडर जिंदाल या कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने हे काम ३६ महिन्यांत पूर्ण करायचे आहे. यामुळे सिंहस्थ कुंभमेळापूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. ही जलवाहिनी पूर्ण झाल्यानंतर नाशिक शहरातील २०५५ पर्यंतच्या लोकसंख्येला पाणी पुरवठा होऊ शकणार आहे.

नाशिक शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी गंगापूर धरण समूह, मुकणे आणि दारणा धरणात पाणी आरक्षित केले जात असले, तरी प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होत असतो. यामुळे गंगापूर धरणातून बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवण्यासाठी १९९७ ते २००० दरम्यान १२०० मिमी व्यासाच्या दोन सिमेंटच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या.

या जलवाहिन्या साधारणपणे २०२१ पर्यंतच्या अंदाजित लोकसंख्येला पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने टाकण्यात आल्या होत्या. मात्र, गत २३ वर्षांत या जलवाहिनीची वहन क्षमता मोठ्या प्रमाणावर कमी झाली असून, जलवाहिनी जुनी झाल्याने वारंवार गळतीची होत असल्याने गंगापूर घरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रा दरम्यान दैनंदिन १५ दलघफू क्षमतेची बारा किलोमीटरची १५०० मिमी व्यासाची नवी लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

नाशिक महापालिकेने २०२१च्या पाणीपुरवठा योजना आराखड्यात या कामाचा समावेश केला होता. त्यात सध्या अस्तित्वात असलेली जलवाहिनी अपुरी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्याचबरोबर सिमेंटची जलवाहिनी असल्याने वारंवार पाणी गळती होऊन पाणीपुरवठा बंद करावा लागतो.

त्यामुळे गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र या दरम्यान ४२५ दशलक्ष लिटर क्षमतेची साडेबारा किलोमीटर लांबीची १८०० मिलिमीटर व्यासाची नवीन लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महापालिकेने केंद्र सरकारच्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून ही योजना प्रस्तावित केली होती. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी २०४ कोटी ३८ लाख रुपये खर्च सुरवातीला मंजूर केले. त्यानंतर महापालिकेने सल्लागार नेमून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेतला व त्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक मान्यताही घेतली. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने टेंडर प्रक्रिया राबवली.

या टेंडर प्रक्रियेची मुदतही संपल्यानंतरही या टेंडरला मुदतवाढ देण्याची तयारी टेंडर समितीकडून सुरू असल्याचा मुद्दा मागील डिसेंबरमध्ये समोर आला होता. दरम्यान महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ही टेंडर प्रक्रिया पूर्ण करून जिंदाल या आंतरराष्ट्रीय कंपनीला एक टक्के कमी दराने हे काम दिले आहे.

नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थापूर्वी हे काम पूर्ण होणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या पाणीपुरवठा आराखड्यानुसार साडेबारा किलोमीटरच्या या जलवाहिनीमुळे २०५५ पर्यंतच्या नाशिक शहरातील लोकसंख्येला पाणी पुरवठा होऊ शकणार आहे.