Nashik, Startup Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: नाशिकरोडची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने काय शोधला उपाय?

चेहेडी येथून पाणी उपसा नियमितपणे करता यावा यासाठी कॉपर डॅम उभारण्याची योजना

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): नाशिक महापालिकेच्या नाशिकरोड विभागाला पाणी पुरवठा करण्यासाठी दारणा धरणात सुमारे ६०० दलघफू पाणी पिण्यासाठी आरक्षित केले जाते. मात्र, दारणा नदीवर उभारण्यात आलेल्या चेहेडी बंधाऱ्यात वालदेवी नदीतील सांडपाणी मिसळत असल्यामुळे चेहेडी येथील जॅकवेलजवळील पाणी दूषित होत आहे. यामुळे महापालिकेला अनेकदा येथून पाणी उपसा थांबवावा लागतो. परिणामी नाशिकरोड भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होतो आणि गंगापूर धरणावर अवलंबित्व वाढते.

यावर तोडगा काढण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने आता ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक रोड विभागाला दररोज ५२ दशलक्ष लिटर (MLD) पाणीपुरवठा करण्यासाठी चेहेडी येथून पाणी उपसा नियमितपणे करता यावा, यासाठी कॉपर डॅम उभारण्याची योजना आखण्यात आली आहे.

नाशिक शहरातील बहुतांश भागाला गंगापूर धरण समूहातून पाणी पुरवठा केला जातो.याव्यतिरिक्त काही भागात मुकणे धरणातून पाणी पुरवले जाते. गंगापूर व मुकणे धरणातील पाणी नाशिकरोड भागात पुरवण्यात तांत्रिक अडचणी असल्यामुळे या भागाला पाणी पुरवठा करण्याठी दारणा धरणात पाणी आरक्षित केले जाते. त्यासाठी दारणा नदीवर चेहेडी येथे बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र, या बंधा-यात वालदेवी नदीतील दूषितपाणी थेट मिसळत असल्याने तेथील जॅकवेलजवळील पाणी दूषित होते. यामुळे तेथून पाणीपुरवठा करण्यात अडचणी येतात.

गेल्या १३ वर्षांत या समस्येवर विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या. मात्र, त्या प्रत्यक्षात उतरल्या नाहीत. दारणा नदीत सांडपाणी जाणार नाही, यासाठी २०१३ मध्ये स्वतंत्र मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव होता. पण तो राबवला गेला नाही. २०१९ मध्ये तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी चेहेडीच्या वरच्या बाजूस नवीन जॅकवेल उभारण्याचे निर्देश दिले होते, परंतु तो प्रकल्पही अपूर्ण राहिला.

मागील वर्षी थेट दारणा धरणातून थेट पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, अमृत योजनेअंतर्गत मंजुरी न मिळाल्याने आणि कुंभमेळा प्राधिकरणाकडूनही परवानगी न मिळाल्याने हा प्रकल्प रखडला आहे.

या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आहेर यांनी प्रशासनाला चेहेडी येथे कॉपर डॅम उभारण्याचे निर्देश दिले आहेत. कॉपर डॅमउभारल्यास त्या माध्यमातून दूषित पाणी जॅकवेलपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जाईल आणि दररोज ५२ दशलक्ष लिटर पाणी उपसा नियमितपणे करता येईल. तसेच, सुमारे १०० मीटर लांबीची स्वतंत्र सांडपाणी वाहिनी टाकून दूषित पाणी वालदेवी नदीपासून दूर वळवण्याचेही नियोजन आहे.

चेहेडी बंधाऱ्यातून नियमित ५२ दशलक्ष लिटर पाणी उपसा सुरू झाल्यास नाशिक रोड विभागातील पाणीटंचाई कमी होईल. तसेच गंगापूर धरणावरील ताणही घटेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. महापौरांनी दूषितीकरण रोखण्यासाठी आवश्यक कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

कॉपर डॅम म्हणजे काय?
कॉपर डॅम हा शब्द थोडा दिशाभूल करणारा आहे. प्रत्यक्षात धरण पूर्णपणे तांब्याचे (कॉपर) बनवलेले नसते. पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी व प्रवाह नियंत्रित करण्यासाठी उभारला जाणारा एक लहान अडथळा अथवा बंधारा आहे.

नदीत किंवा बंधाऱ्याजवळ कमी उंचीचा अडथळा उभारून त्याद्वारे पाण्याचा प्रवाह नियंत्रित करून स्वच्छ पाणी एका बाजूला धरून ठेवले जाते व दूषित पाणी पुढे जाते. हा बंधारा पूर्ण तांब्याचा नसतो. प्रामुख्याने काँक्रीट, स्टील प्लेट्स, गेट्स वापरले जातात. काही ठिकाणी तांब्याचा लेप लावला जातो. यामुळे जॅकवेलपर्यंत दूषित पाणी पोहोचत नाही.