नाशिक (Nashik): आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या ६६ किलोमीटर लांबीच्या बाह्य रिंगरोड (परिक्रमा मार्ग) प्रकल्पाच्या कामाला येत्या जून महिन्यात प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. मात्र, कुंभमेळ्यापूर्वी म्हणजे ३१ मे २०२७ पर्यंत या मार्गावरील ३ मोठ्या पुलांचे काम पूर्ण करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले असून, प्रशासनासमोर वेळेचे प्रचंड मोठे आव्हान उभे राहिले आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित बाह्य रिंगरोड अर्थात परिक्रमा मार्ग प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून जूनमध्ये या रिंगरोडच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या बारा महिन्यांवर येऊन ठेपणार असून पावसाळ्यातील संततधार पावसाचे दोन महिने गृहित धरल्यास ६६ किलोमीटर रस्ता व त्यातील तीन ठिकाणच्या मोठ्या पुलांची कामे एवढ्या कमी वेळेत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. त्यात रस्त्यांची कामे विक्रमी वेळेत पूर्ण होऊ शकतात. मात्र, या मार्गावरील पुलांची कामे कितीही वेगाने केली तरी दीड वर्षांपेक्षा कमी कालावधित होऊ शकणार नाहीत. यामुळे सिंहस्थापूर्वी रिंगरोडचे काम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरू करणे ही जवळपास अशक्य गोष्ट असल्याचे मत या क्षेत्रातील अभ्यासकांचे निरीक्षण आहे.
नाशिक रिंगरोड तथा परिक्रमा मार्ग ६६ किलोमीटर लांबीचा असून, तो नाशिक शहराभोवती वळसा घेत २५ गावांमधून जात आहे. या मार्गामुळे मुंबई-आग्रा महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग, त्र्यंबकेश्वर मार्ग तसेच समृद्धी महामार्गाशी जोडणी अधिक सुलभ होणार आहे. तसेच प्रस्तावित इगतपुरी- तवा (वाढवण) या मार्गालाही तो जोडला जाणार आहे.
यामुळे या मार्गांवरील वाहने शहरात प्रवेश न करता या रिंगरोडने दुस-या रस्त्यांना जोडता येणार असल्याने नाशिक शहरातील दैनंदिन वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणने ७,६०० कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्या असून त्यातील ३,६५० कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर केले आहेत.
भूसंपादनाचा खर्च राज्य सरकार करणार असून केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने प्रकल्पातील सुमारे ४७.९ किलोमीटर मार्गाच्या बांधकामासाठी ३ हजार ९५४ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. या टप्प्यात चार पदरी रस्ता आणि भविष्यात सहा पदरी विस्ताराची क्षमता ठेवण्यात आली आहे.
या प्रकल्पात तीन मोठे पूल, १८ लहान पूल, २९ वाहन अंडरपास आणि सात व्हायाडक्ट्स उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी सुमारे ३८५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून, मार्ग २५ गावांच्या हद्दीतून जाणार आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार जवळपास ३३० हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी देण्यास जमीनधारकांनी संमती दिली आहे. विरोध असलेल्या जमीनधारकांशी प्रशासनाकडून चर्चा करून तोडगा काढण्याचे काम वेगाने सुरू आहे.
भूसंपादन हा सध्या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा ठरत आहे. प्रशासनाने सुरुवातीला या मार्गासाठी ३१ मार्चपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, आता मे महिना संपत आला, तरीही अद्याप पूर्ण भूसंपादनासाठी संमती मिळालेली नाही. अनेक गावांतील शेतकऱ्यांनी मार्गाचे आरेखन बदलण्याची मागणी करीत विरोध दर्शविला आहे.
विशेषतः शेती आणि निवासी मालमत्तांवर परिणाम होत असल्याने आरेखनात बदल करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, राज्य सरकारने या प्रकल्पासाठी विशेष सवलत देत १०० टक्के भूसंपादन पूर्ण होण्याची अट शिथिल केली आहे. आता ५० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
यामुळे जूनच्या पहिल्या, दुस-या आठवड्यात काही ठिकाणी या रिंगरोडच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकते, इतपत जमिनी थेट खरेदीने विकत घेण्यात प्रशासनाला यश आले आहे. सरकारी जमीन असलेल्या ठिकाणी यापूर्वीच रस्ता बांधणीच्या कामाला प्रारंभही झाला आहे. मात्र, या मार्गावरील तीन मोठे पूल उभारणीचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळासमोर असणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने हा रिंगरोड अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शहराच्या भविष्यातील विस्ताराला दिशा देणारा आणि औद्योगिक तसेच धार्मिक पर्यटनाला चालना देणारा हा प्रकल्प नाशिकच्या पायाभूत विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
मात्र, या प्रकल्पाचे काम सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी म्हणजे ३१ मे २०२७ पूर्वी होणे अशक्य असल्याचे या प्रकल्पाच्या कामात सहभागी सर्वच यंत्रणांना माहित आहे. मात्र, सिंहस्थापूर्वी हे काम काही प्रमाणात पूर्ण करीत किमान काही भागामध्ये रिंगरोडवरून वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.