नाशिक (Nashik) : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर जाण्या - येण्यासाठी सध्या नांदुरी ते सप्तशृंगगड हा एकमेव घाटरस्ता आहे. या मार्गावर दरड कोसळल्यास रस्ता वाहतुकासाठी बंद होतो. तसेच चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवाच्या काळातील भाविकांची संख्या मोठ्याप्रमाणावर असल्याने वाहतूक कोंडी होऊन भाविकांचे हाल होत असतात. यामुळे एकाच रस्त्यावर अवलंबून राहण्यापेक्षा इतर पर्यायी रस्त्यांबाबत अनेक वर्षांपासून विचार सुरू होता.
अखेरीस सप्रश्रृंग गडावर जाण्यासाठी भाविकांना पर्यायी रस्ता उपलब्ध होऊ शकणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पारंपारिक रडतोंडी घाट रस्त्याच्या सर्वेक्षणासाठी १.५५ कोटींचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे. यामुळे भविष्यात भाविकांना सप्तश्रृंग गडावर जाण्यासाठी नांदुरी ते सप्तश्रृंग गड व वणी ते सप्रश्रृंग गड हे दोन मार्ग उपलब्ध होऊ शकणार आहेत.
सप्तशृंगी देवी उत्तर महाराष्ट्रासह गुजरातमधील असंख्य भाविकांची कुलदेवी आहे. यामुळे दरवर्षी चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक सप्तश्रृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी येत असतात. सध्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी भाविकांना नांदुरी ते सप्तशृंगगड हा एकमेव घाटमार्ग आहे. वर्षागणिक भाविकांच्या संख्येत वाढ होत असल्याने सध्याचा मार्ग अपुरा पडत आहे.
या घाटमार्गावर दरवर्षी मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचे प्रमाणही अधिक आहे. दरड कोसळल्यामुळे काही दिवस रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला जातो. त्यातच दरड कोसळल्यामुळे यात्रेकरू आणि स्थानिक नागरिक यांची जीवित व मालमत्तेची हानी होण्याचा धोका वाढतो.
भविष्यातील संभाव्य अपघात आणि वाहतूक अडथळे टाळण्यासाठी व भाविकांना विना अडथळा सप्तश्रृंगगडावर जाता यावे, यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रडतोंडी घाटमार्गे नवीन रस्त्याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्य होत्या.
त्याचप्रमाणे या रस्ते सर्वेक्षणाचा प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी १.५५ कोटी रुपयाचे अंदाजपत्रक सादर करून तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे.
सर्वेक्षण कार्य : २८ लाख ३४ हजार ३६२
जमीन संपादनाचे काम : ८१ लाख ८६ हजार ९५१
भूतांत्रिक, माती सर्वेक्षण काम : ५ लाख ६३ हजार ६५९
डिझाइन, अंदाज, रेखाचित्र काम : १४ लाख ७१ हजार ५२६
जीएसटीसाठी : २३ लाख ५० हजार १६९
कामगार विमा : १ लाख ३० हजार ५६५
एकूण : १ कोटी ५५ लाख ३७,२३३
रडतोंडीमार्गे घाटरस्ता झाल्यास
सध्याच्या घाटमार्गावरील अपघातांचा धोका कमी होऊ शकतो.
सुरक्षित, सुलभ व अखंड वाहतुकीची सुविधा निर्माण होईल.
सप्तशृंगगड धार्मिक पर्यटन विकासाला चालना मिळेल.
सप्तशृंगगड - नांदुरी या राज्यमार्गाला सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध होईल