Nashik City, nmc, Kumbh Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: नाफेडच्या कांदा खरेदी केंद्र टेंडरमध्ये मोठा घोटाळा; अपात्र संस्थाना केले पात्र

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): भारत सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेनुसार यावर्षी कांदा खरेदी सुरू होण्यापूर्वीच नाफेडने खरेदीदार निवडताना टेंडरमध्ये सादर केलेली कागदपत्रे अपुरी असूनही त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून त्यांना खरेदी केंद्रासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. खरेदीसाठी निवड केलेल्या संस्थांचे उलाढाल दाखले केवळ रोखीच्या व्यवहारांवर आधारित असूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.

याबाबत नाफेड व जिल्हा उपनिबंधक कार्यालय एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. यामुळे टेंडरच्या निकषात न बसणा-या संस्थांकडून होणारी ही कांदा खरेदी शेतक-यांना कितपत न्याय देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या खरेदीदार संस्था निवडताना टेंडर समितीवर राजकीय दबाव होता व त्या दबावातून त्यांनी निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 

केंद्र सरकारने यावर्षी एनसीसीएफ व नाफेड यांच्या माध्यमातून कांदा खरेदी करताना खरेदीदार संस्था व कांदा साठवणा-या संस्था वेगवेगळ्या ठेवण्याचा निर्णय घेतला. यातून खरेदी व साठवणुकीत होणारे गैरप्रकार टाळण्याचा उद्देश आहे. त्यानुसार कांदा साठवणुकीची जबाबदारी वखार महामंडळाकडे देण्यात आली. वखार महामंडळाने निश्चित केलेल्या कांदा साठवणूक केंद्रांच्या आसपास कांदा खरेदी केद्र सुरू करण्यासाठी सहकारी संस्था निवडण्यासाठी एप्रिलमध्ये टेंडर प्रसिद्ध केले.

या टेंडरमध्ये सहभागी होण्याची मुदत ६ मे पर्यंत होती. या टेंडरमध्ये प्राथमिक कृषी सहकारी संस्था, नाफेडशी संलग्न सहकारी संस्था व महाराष्ट्र सहकार कायदा १९६० नुसार स्थापन झालेल्या सहकारी संस्था यांच्याकडून टेंडर मागवण्यात आली होती. त्यामध्ये या सहकारी संस्थांची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपये असण्याची अट होती. त्यासाठी सनदी लेखापालाकडून कॅशफ्लो प्रमाणपत्र घेऊन ते जोडणे आवश्यक होते.

याशिवाय या टेंडरसाठी पात्र ठरण्यासाठी संबंधित संस्थाचे खेळते भांडवल २५ लाख रुपये असणे आवश्यक होते. या टेंडरची मुदत संपल्यावर ८ मे रोजी तांत्रिक लिफाफा उघडण्यात येऊन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पात्र ठरलेल्या संस्थांचा वित्तीय लिफाफा उघडण्यात येऊन नाशिक जिल्ह्यातील १९ सहकारी संस्थांना खरेदी केंद्र चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर या संस्थांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केले आहेत.

सहकार विभागाचे नरो वा कुंजरो वा
या सहकारी संस्थांनी टेंडरसोबत दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये सहकारी संस्थांचे लेखा परीक्षण, अवसायानात आहे किंवा नाही, उलाढाल याबाबतची सत्यता पडताळणी करण्यासाठी नाफेडने ती कागदपत्र व यादी जिल्हा उपनिबंधकांकडे पाठवली. त्यात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने  पडताळणी करून केवळ या संस्था अवसायान नसल्याचे नाफेडला कळवले आहे. इतर माहितीची पडताळणी करणे आमची जबाबदारी नसल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे या संस्थांच्या कागदपत्रांमधील सत्यतेबाबत नाफेड व सहकार विभाग एकमेकांकडे बोट दाखवून आपली मान सोडवून घेत आहे.

एक कोटीचे व्यवहार रोखीमध्ये
या सहकारी संस्थांनी सादर केलेली कागदपत्रे, त्यात प्रामुख्याने उलाढाल (कॅशफ्लो) प्रमाणपत्र, खेळते भांडवल व अनुभवाचे दाखले याबाबत संशय निर्माण झालेला आहे. या पात्र ठरलेल्या संस्थांमधील प्रामुख्याने अटल नावीन्यपूर्ण, बहुउद्देशीय या प्रकारच्या सहकारी संस्थांनी जोडलेली कागदपत्र संशयाच्या भोव-यात सापडले आहेत. या कागदपत्रांमध्ये उलाढाल (कॅश फ्लो) प्रमाणपत्र संशयाच्या भोव-यात आहेत. काही सहकारी संस्थानी लेखा परीक्षण करताना त्यात कांदा खरेदीचे व्यवहार रोखीमध्ये दाखवले आहेत. त्याच रोखीच्या व्यवहाराच्या आधारे सनदी लेखापालांनी उलाढाल प्रमामपत्र दिले आहे. यामुळे या सहकारी संस्थांच्या व्यवहारातील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित होत आहे.

सहकारी संस्थांना रोखीमध्ये व्यवहार करण्याची परवानगी असते का, या प्रश्नाचे उत्तर सहकार विभागातील अधिकारीही स्पष्टपणे देत नाहीत. यामुळे प्रत्यक्षात एक कोटींचे व्यवहार केले नसल्याने रोखीच्या व्यवहारांचा आधार घेतल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. यामुळे या उलाढालीची चौकशी होण्याची गरज आहे. एकीकडे व्यक्तिगत व्यावसायीकांनी किती रकमेपर्यंतचे व्यवहार रोखीत करावे व कोणते व्यवहार बॅंकेच्या माध्यमातून करावेत, याबाबत स्पष्ट नियम असताना सहकारी संस्था एक कोटी रुपयांपर्यंतचे व्यवहार रोखीत कसे करू शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, सहकार विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे या प्रकरणातून समोर आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील कांदा खरेदी करणा-या संस्था व केंद्र (कंसामध्ये)

चांदवड तालुका बहुउद्देशीय सहकारी संस्था (चांदवड)
गोदावरी विविध कार्यकारी सहकारी संस्था (पिंपळगाव बसवंत)
इंदुमती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था (उमराणे)
कळवण बुद्रूक विविध सहकारी सेवा संस्था (देवळा)
कळवण तालुका बहुउद्देशीय सहकारी संस्था (उमराणे)
कृषीसाधना महिला मल्टिस्टेट अॅग्रो सहकारी संस्था (विंचूर)
नांदगाव तालुका तुळजा भवानी संस्था (नांदगाव)
ओम चैतन्य मल्टीस्टेट अॅग्रो परपज सोसायटी (निफाड)
पिंपळगा बसवंत विविध कार्यकारी सहकारी संस्था (पिंपळगाव बसवंत)
प्राउटिस्ट मल्टीस्टेट सहकारी सोसायटी लि. (नामपूर)
राजूरकर कृषी सहकारी संस्था (निफाड)
रेणुका अटल कृषी पणन नावीन्यपूर्ण सहकारी संस्था (देवळा)
सह्याद्री अॅग्रो कृषी पणन नावीन्यपूर्ण सहकारी संस्था (ताहराबाद)
शेतकरी सहकारी संघ लि. कळवण (देवळा)
श्री गुरूजी अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था (लासलगाव)
श्रीशक्ती महिला अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था (चांदवड)
दि. सप्तर्षी फार्मर प्रोड्यूसर सहकारी संस्था लि. (चांदवड)
वडगाव गिरणारे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था (लासलगाव)
वैष्णवी अटल नावीन्यपूर्ण बहुउद्देशीय संस्था (लासलगाव)