Nashik Municipal Corporation.
Nashik Municipal Corporation. Tendernama
उत्तर महाराष्ट्र

नाशिक महापालिकेचा डेटा हॅकर्सच्या रडारवर; सुरक्षिततेसाठी...

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेचे संकेतस्थळ, मोबाईल ॲप तसेच नागरिकांच्या माहितीचे डिजीटायझेशनचा डाटा आयटी विभागाच्या माध्यमातून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, हॅकर्सकडून मागील आठवड्यात महापालिकेच्या संकेतस्थळावरील डेटा क्रॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. सायबर हल्लेखोरांचा हा हल्ला परतावून लावण्यास महपालिकेच्या आयटी विभागाला यश आले आहे. आयटी विभागाने केलेल्या ग्लोबल आयपी ऍड्रेस तपासणीनंतर अमेरिकन हायजॅकर्स असल्याचे लक्षात आले आहे. यामुळे भविष्यातील संभाव्य हल्ला रोखण्यासाठी डाटा अधिक सुरक्षित करण्यात आला आहे.

महापालिकेकडून नागरिकांसंबंधी तसेच प्रशासकीय अशा ४३ प्रकारच्या माहितीचे डिजिटायझेशन सुरू आहे. यासाठी महापालिकेत स्वतंत्र आयटी विभाग निर्माण करण्यात आला. आयटी विभागाच्या माध्यमातून यंत्रणेवर नियंत्रण ठेवले जाते. सोबतच महापालिकेच्या संकेतस्थळाचेही काम आयटी विभागाकडून केले जाते. अमेरिकन हॅकर्सने मागील आठवड्यात संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस पाठवत, संगणकीय यंत्रणा ठप्प केली. त्यानंतर आयटी विभागाने २४ तास हॅकर्सशी लढा देऊन हल्ला परतावून लावला. संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस घुसवण्यात आल्याची माहिती समोर आली. यानंतर आयटी विभागाने महापालिकेचा सर्व डेटा सुरक्षित केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सूचनेनुसार सायबर पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. संगणक नेटवर्कमध्ये घुसलेला व्हायरस हटवला नसता तर महापालिकेच्या ४३ विभागांचा डाटा नष्ट झाला असता.

संगणकावरील डेटा सुरक्षित ठेवण्याचे काम फायरवॉलच्या माध्यमातून करण्यात येते. हॅकर्सकडून फायरवॉलवर सातत्याने हिटस्‌ दिल्या जातात. त्यात फायरवॉल क्रॅक झाल्यानंतर पुन्हा फायरवॉल दुरुस्त करावी लागते. मात्र, त्यात संपूर्ण संगणकाचे स्वरुप पूर्ववत करावे लागते. या सायबर हल्ल्यात डेट हॅक झाला असता, तर महापालिकेच्या महसुलासंबंधी अडचणी निर्माण झाल्या असत्या.