Nashik Municipal Corporation.
Nashik Municipal Corporation. Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : घंटागाडी ठेका चौकशीचा वेग आणि आवेश दोन्हीही मंदावले

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : घंटागाडी अनियमिततेबाबत महापालिकेकडून गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू असलेल्या चौकशीचा वेग मान्सूनपूर्व कामांच्या प्राधान्यतेचे कारण देत मंद करण्यात आला आहे. आधी गटारी, नालेसफाई या कामांवर फोकस केला जाईल, त्यानंतरच घंटागाडी चौकशीला वेळ दिला जाईल, अशी भूमिकाच प्रशासनाने घेतल्याने घंटागाडी ठेक्याची चौकशी लांबली आहे. दरम्यान मे मध्ये विभागीय आयुक्तांनी आदेश देऊनही पहिल्यांदा चौकशी न करणाऱ्या महापालिका प्रशासनाने स्मरणपत्र मिळाल्यानंतर चौकशी सुरू केली, पण आता ती लांबणीवर पडणार असल्याने विभागीय आयुक्त कार्यालय काय भूमिका घेते याकडे लक्ष आहे.

नाशिक शहरात १ डिसेंबर २०२२ पासून ३९६ घंटागाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र, सुरुवातीपासून ३५४ कोटींच्या ठेक्याच्या कार्यरंभ आदेशातील अटी शर्तीनुसार काम केले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. तक्रारींमध्ये साधारणपणे लहान घंटागाड्याचा वापर करणे, घंटागाड्याची उंची अधिक असल्यामुळे महिलांना कचरा टाकण्यात अडचणी येणे, अनेक ठिकाणी घंटागाडी अनियमित येणे आदी तक्रारी आहेत. यात कळीचा मुद्दा म्हणजे, ओला व सुका कचरा विलगीकरणच अनेक ठिकाणी बंद झाल्याच्या तक्रारी आहेत. नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करून देत असताना लहान घंटागाड्यातून मोठ्या घंटागाडीत कचरा भरताना तो एकत्र केला जातो.

जवळपास ८६ लहान - घंटागाड्यातून मोठ्या गाडीत कचरा टाकताना हा गोंधळ होत असल्यामुळे या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, घनकचरा व्यवस्थापन विभाग त्यास दाद देत नाही. यामुळे घंटागाडी ठेकेदारांविरोधात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे तक्रार केली गेली. यामुळे विभागीय आयुक्त गमे यांनी चौकशी समिती नियुक्त केली. या चौकशी समितीत वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र घोडे महाजन, यांत्रिकी विभागाचे अधिक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी तसेच घनकचरा संचालक डॉ. कल्पना कुंटे अशा चौघांचा समावेश केला. समितीने आठ दिवसांत अहवाल द्यावा, असे निर्देश असताना दहा दिवस उलटूनही या चौकशीला सुरुवात केली नव्हती. वेळेत चौकशी सुरू न केल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेला पुन्हा स्मरणपत्र पाठवले. यामुळे खडबडून जागे होत, समितीने घंटागाडीच्या अनियमिततेची चौकशी ८ जूनपासून सुरू केली.

घंटागाडीची स्थिती, घंटागाडीच्या फेऱ्या, कर्मचाऱ्यांकडून ठेकेदारावर केले जाणारे आरोप, स्वच्छता निरीक्षकाला झालेली शिवीगाळ प्रकरण यासह सर्व बाजूने याप्रकरणाची चौकशी होइल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणी समिती सदस्य रोज फिल्डवर जात पाहणी करत निरीक्षणे नोंदवत होते. पण अचानक जोरात सुरू असलेल्या या चौकशीचा वेग या आठवड्यात मंदावला आहे. सध्या मान्सूनपूर्व कामांवर भर दिला जात असून, त्यात नालेसफाई, रस्ते खड्डे बुजविणे या कामांना अधिक प्राधान्य दिले जाणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे चौकशीचा वेग व आवेश दोन्ही थंडावल्याचे पाहायला मिळते. आता विभागीय आयुक्त कार्यालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.