road
road Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : पेठरोडच्या काँक्रिटिकरणास कोणी निधी देते का निधी?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : महापालिका हद्दीतील पेठरोडच्या साडे सहा किलोमीटर काँक्रिटीकरणासाठी महापालिका, स्मार्ट सिटी कंपनी, राज्य सरकारचा बांधकाम विभाग यांच्याकडून नकार घंटा आल्यानंतर आमदार राहुल ढिकले यांच्या सूचनेनुसार नगरविकास विभागाकडे ७१ कोटींच्या निधीची मागणीकरण्यात आली. मात्र, राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने निधी देण्यास नकार देतानाच पावसाळ्यापूर्वी हणजेच येत्या तीन महिन्यांत या रस्त्याचे महापालिकेच्या निधीतून डांबरीकरण करण्याचे निर्देश नगरविकास विभागाचे उपसचिव यांनी दिले आहेत. यामुळे या रस्त्याचे काँक्रीटीकरण मृगजळ ठरले आहे. दरम्यान हा मार्ग आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरित करण्याचा एकमेव पर्याय उरला असून त्याचीही चाचपणी सुरू असल्याचे समजते.

नाशिक पेठ हा मार्ग काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग जाहीर करून महापालिका हद्दीबाहेर त्याचे पेठपर्यंत कंक्रिटिकरण करण्यात आले आहे. महापालिका हद्दीत साडेसहा किलोमीटर भागात हा रस्ता डांबरीकरणचा असून महापालिकेकडे पुरेसा निधी नसल्याचे कारण देत त्याची वेळोवेळो दुरुस्ती न झाल्याने त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील पावसाळ्यात या रस्त्याची आणखी दुरवस्था झाली. पेठरोडवरील पेठ फाटा ते महापालिका हद्द संपेपर्यंतचा सुमारेसाडेसहा किलोमीटर लांबीचा रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे खचला आहे. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलनही केले होते. त्यातून महापालिकेने या रस्त्याची दुरुस्ती प्रस्तावित केली. दरम्यान या2 रस्त्याची दुरवस्था बघून आमदार अँड. ढिकले यांनी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर ठेवला. मात्र, महापालिकेने आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचे कारण दिले. त्यानंतर त्यांनी नाशिक स्मार्ट सिटी कंपनी समोर प्रस्ताव ठेवला. कंपनीने महासभेचा ठराव आल्यास या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची तयारी दर्शवली. महासभेने या बांधकाम विभागाच्या आराखड्यानुसार या रस्त्याच्या ७१ कोटींच्या कंक्रिटिकरणास मान्यता देणारा ठराव मंजूर केला.

दरम्यान स्मार्टसिटी कंपनीची मुदत जून २०२३ पर्यंत संपणार असून केंद्र सरकारने नवीन कामे प्रस्तावित करण्यास मनाई केल्याचे सांगत हे काम करण्यास नकार दिला. त्यानंतर आमदार राहुल ढिकले पाणी जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही यश आले नाही.राज्याच्या बांधकाम विभागाकडे रस्ता हस्तांतरित करून तिकडून निधी मिळतो का याची चाचपणी करून बघितले. यानंतर महापालिकेने  दुरुस्तीसाठी टेंडर प्रक्रिया राबवून दोन कोटींच्या निधीतून हे काम करण्याची प्रक्रिया सुरू केली.

दरम्यान महापालिकेने स्मार्ट सिटीच्या वादग्रस्त ठेकेदाराला रस्ता दुरुस्तीचे काम देण्याचा प्रयत्न झाला. संबंधित ठेकेदार विरोधात आमदार राहुल ढिकले यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करीत सरकारच्या नजरेस ही बाब आणून दिली. त्याचप्रमाणे पेठ रोडच्या दुरवस्थेसंदर्भात आमदार राहुल ढिकले यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना अद्याप सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. यामुळे आता त्यांच्यासमोर नाशिक पुणे महामार्गाच्या द्वारका चौक ते नाशिक रोड या भागासाठी केंद्र सरकारकडून निधी आणला, तसा पेठ रोड हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने केंद्र सरकारकडून निधी मिळवण्यासाठी एक पर्याय उरल्याचे दिसत असून, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते.