Parking
Parking Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : 33 स्मार्ट पार्किंग स्लॉट वाऱ्यावर; ठेकेदाराचा काढता पाय

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : शहरात सर्वाधिक गंभीर समस्या असलेल्या पार्किंगचा तिढा अद्यापही सुटण्याचे संकेत दिसत नाही. महापालिकेने वाहनतळाचे व्यवस्थापन करण्यासाठी कंपनीच्या अटी व शर्ती मंजूर करूनही पार्किंग स्लॉट चालविण्यास घेतलेल्या ट्रायजेन कंपनीने थेट नकार दिला आहे.

यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले वाहनतळ वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थिती आहे. महापालिका व स्मार्ट सिटी कंपनीला आता पुन्हा नव्याने वाहनतळ चालवण्यासाठी नवीन ठेकेदाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

नाशिक मुन्सिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीच्या वतीने खासगी-सार्वजनिक भागिदारी (पीपीपीए तत्त्वावर स्मार्ट पार्किंग प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रस्त्यांच्या कडेला २८ ठिकाणी, तर मोकळ्या जागांवर पाच अशा ३३ ठिकाणी वाहनतळ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

स्मार्ट सिटी कंपनीने पार्किंग स्लॉट तयार करण्याबरोबरच व्यवस्थापन करण्याचे काम दिल्ली येथील ट्रायजेन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे सोपवले होते. त्याच काळात कोरोना महामारीचा उद्रेक झाला. यामुळे लॉकडाऊन काळात वाहनतळ सुरू करण्याआधीच बंद पडले.  यामुळे कंपनीला कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये या पार्किंगमधून कंपनीला शुल्क वसुली करता आली नाही.

कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीने ट्रायजेन कंपनीला पार्किंग स्लॉट सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, कोरोना काळात आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करत दरवर्षी दिल्या जाणाऱ्या रॉयल्टीत कंपनीला १७ लाख रुपयांची सूट देण्याची मागणी संबंधित कंपनीतर्फे करण्यात आली. त्याचबरोबर दुचाकींसाठी पाच ऐवजी १५ रुपये व  चारचाकीसाठी दहा रुपये ऐवजी ३० रुपये प्रति तास शुल्क वाढ द्यावी तसेच कंपनीला तीन वर्षांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी कंपनीतर्फे करण्यात आली. याशिवाय उत्पन्न अधिक वाढावे म्हणून टुरिंगची सुविधा सुरू करण्याची देखील मागणी करण्यात आली.

स्मार्टसिटी कंपनीने याबाबत महापालिका आयुक्तांना यात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यानुसार आयुक्तांनी टुरिंगसह दीड वर्षे मुदतवाढ देण्याचे मान्य केले.मात्र, इतर मुद्यांबाबत महापालिका व ट्रायजेन कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक होऊनही तोडगा न निघाल्याने अखेर कंपनीने पार्किंग स्लॉट चालवण्यास नकार दिला आहे. यामुळे आता स्मार्ट सिटी कंपनीला वाहनतळ चालवण्यासाठी नवीन ठेकेदारांचा शोध घ्यावा लागणार आहे.

या ठिकाणी आहेत पार्किंग स्लॉट
-
कुलकर्णी गार्डनजवळ साधू वासवानी रोड
- कुलकर्णी गार्डन ते बीएसएनएल ऑफिस
- ऋषिकेश हॉस्पिटल ते गंगापूर नाका
- प्रमोद महाजन गार्डनच्या पुढील
- जेहान सर्कल ते एबीबी सर्कल
- गुरुजी हॉस्पिटल ते पाइपलाइन रोड
- मोडक पॉइंट ते खडकाळी रोड
- शालिमार ते नेहरू गार्डन थत्तेनगर रोड
- श्रद्धा पेट्रोलपंप ते वेस्टसाइड मॉल
- कॅनडा कॉर्नर ते विसे मळा
- बी. डी. भालेकर हायस्कूल ग्राउंड
- जेहान सर्कल ते गुरुजी हॉस्पिटल
- शालिमार अण्णा शास्त्री हॉस्पिटल