नाशिक (Nashik): सिंहस्थ आराखडा तयार होऊन त्यातील कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू असतान युवक व क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या आराखड्यातील त्रुटी प्रशासनाच्या लक्षात आणून देत दोन पर्याय सूचवले आहेत.
कोकाटे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यात दोन नवीन मार्ग समाविष्ट करण्याची सूचना महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना केली आहे. मंत्री कोकाटे यांनी नाशिक शहरातील गंगापूर रोडला समांतर असा गोदावरीच्या उत्तर बाजूने नवीन रस्ता उभारल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे म्हटले आहे. तसेच नाशिक-सिन्नर या नाशिक-पुणे महामार्गाला समांतर असा भगूर-पांढुर्ली रस्ता मार्गे सिन्नर असा रस्ता उभारण्याचा पर्याय सूचवला आहे. प्रशासनानेही त्यांच्या या सूचनांप्रमाणे पाहणी करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये होत असून त्यासाठी जवळपास २५ हजार कोटींचा आराखडा तयार करून त्या आराखड्यातील कामे मार्गी लावण्याची प्रशासनाची सध्या धावपळ सुरू आहे. हा आराखडा प्रामुख्याने नाशिक महापालिका, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, जिल्हा प्रशासन, नाशिक महानगर विकास प्राधिकरण, जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तयार केला आहे.
या आराखड्यात नाशिक व त्र्यंबकेश्वर यांना जोडणारे २२७० कोटींचे मार्ग, नाशिक शहरातील २२०० कोटींचे रस्ते व पूल, जवळपास आठ हजार कोटींचा परिक्रमा मार्ग यांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिक शहरातील जुन्याच रस्त्यांची कामे नव्याने करण्यावर भर दिला आहे. मात्र, आताच वाहतूक कोंडीचा प्रचंड सामना करणा-या गंगापूर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
गंगापूर रोडचे रुंदीकरण करणे हा त्यावरील उपाय होऊ शकत नाही. यामुळे युवक व क्रीडा मंत्री कोकाटे यांनी गंगापूररोडला समांतर रस्ता सूचवला आहे. त्यांनी गोदावरीच्या उत्तर बाजूने गोदावरीला समांतर रस्ता केल्यास सध्या पंचवटीतून गंगापूर रोडला येणारी वाहने त्या नवीन मार्गाने जाऊन वेगवेगळ्या भागात विभागली जातील व गंगापूररोडवरील वाहतुकीचा ताण कमा होऊ शकणार आहे. या नवीन समांतर रस्त्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे.
कोकाटे यांनी गंगापूर रोडप्रमाणेच नाशिक व सिन्नर यांना जोडणाऱ्या नाशिक-पुणे महामार्गाला समांतर रस्ता सूचवला आहे. हा रस्ता प्रामुख्याने भगूर-पांढूर्ली मार्गावरून विंचूर गवळी - वडगाव पिंगळा - पास्ते - जामगाव मार्गे सिन्नर असा आहे. हा रस्ता नाशिकच्या बाह्यवळण रस्त्याला जोडल्यास आपत्कालीन परिस्थितीत नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक या समांतर मार्गाने जोडता येणार आहे.
नाशिक-सिन्नर या मार्गावर सध्या बऱ्याचदा वाहतूक कोंडी होत असते. सिन्नर येथील दोन औद्योगिक वसाहती व शिर्डीसाठी जाणारी वाहने यांच्यामुळे सध्याचा हा मार्ग अपुरा पडत आहे. त्यातच सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिकला येणारे भाविक शिर्डीलाही जातील, असे गृहित धरून प्रशासनाने सिंहस्थाचे नियोजन केले आहे.
ते बघता सिंहस्थ काळात सिन्नरला जाणारी वाहतूक केवळ नाशिक-पुणे मार्गावर अवलंबून ठेवणे अडचणीचे ठरू शकते. यामुळे कोकाटे यांनी नाशिक-पुणे मार्गाला समांतर मार्ग सूचवला आहे. हा मार्ग नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो. नाशिक महापालिका व महानगर विकास प्राधिकरण यांनी या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळे या रस्त्यांची निकड लक्षात घेता, त्यांचा समावेश सिंहस्थ आराखड्यात होऊ शकतो.