Nashik Municipal Corporation Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: महापालिकेच्या सिंहस्थ आराखड्यातील 840 कोटींच्या रस्त्यांवर प्राधिकरणाची फुली?

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : नाशिक महापालिकेने सिंहस्थानिमित्त तयार केलेल्या आराखड्यात नाशिक शहरात २०६८ कोटींचे रस्ते उभारण्याचे नियोजन केले होते. मात्र, कुंभमेळा प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात ९३० कोटींच्या २१ रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात केवळ २९८.५५ कोटींच्याच रस्ते कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

सिंहस्थ आराखड्यातील २,०६८ कोटींच्या रस्ते कामांपैकी आतापर्यंत केवळ १,२२८ कोटींच्या रस्ते कामांना प्रशासकीय मंजुरी मिळू शकली आहे. आता उर्वरित ८४० कोटींच्या रस्ते कामांचे काय, असा प्रश्न यामुळे समोर आला आहे.

नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यादृष्टीने नाशिक महापालिकेने सिंहस्थ आराखडा तयार केला असून, या आराखड्यातील कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे अधिकार राज्य शासनाने स्थापन केलेल्या कुंभमेळा प्राधिकरणला आहेत.

सध्या सिंहस्थकामांना वेग आला असून नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या ५,७५६ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. सिंहस्थ आराखड्यात नाशिक महापालिकेने शहरातील ६१ रस्त्यांची कामे समाविष्ट केली आहेत. या रस्त्यांसाठी २,०६८ कोटी रुपये निधीची गरज आहे.

कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या निर्देशांनुसार महापालिकेने या रस्त्यांचा प्राधान्यक्रम पोलिसांकडून मंजूर करून घेतला आहे. त्यानुसार  या ६१ रस्त्यांची प्राधान्यक्रमानुसार अ, ब, क अशी तीन टप्प्यांत वर्गवारी करण्यात आली आहे.

महापालिकेने ही संपूर्ण यादी अंतिम मंजुरीसाठी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाला सादर केली होती. त्यानुसार प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यात २१ रस्ते कामांना व दुसऱ्या ९ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता दिला आहे. या दोन्ही प्रशासकीय मान्यतेनुसार एकूण १२२८ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

महापालिकेच्या ६१ रस्ते कामांपैकी २१ कामे मंजूर झाली असून, उर्वरित ४० रस्त्यांनाही लवकरात लवकर मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. ही सर्व कामे ३१ मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. यामुळे या कामांना आता मंजुरी मिळाल्यानंदर किमान काम पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी मिळू शकेल. मात्र, प्राधिकरणकडून इतर कामांना मंजुरी दिली जात नसल्याने ही कामे प्राधान्याची असल्याने महापालिका प्रशासनाला पटवून देता येत नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कदाचित या कामांवर प्राधिकरणकडून फुली मारली जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.

पहिल्या टप्प्यात मंजूर केलेल्या ९३० कोटींच्या रस्ते कामांमध्ये क्लब टेंडरिंग झाल्याचे आरोप झाले होते. यामुळे या नऊ रस्त्यांच्या बाबतीत प्राधिकरणने १२९ कोटींच्या केवळ एकच रस्त्याचे मोठे काम मंजूर केले आहे. उर्वरित आठ रस्त्यांची कामे स्थानिक आणि छोट्या ठेकेदारांना देण्याचा निर्णय घेतला आहे. नऊ रस्त्यापैकी चार रस्त्यांचे काँक्रिटीकरण, एक रस्त्याचे व्हाइट टॅपिंग तर उर्वरित चार रस्ते डांबरीकरण केले जाणार आहेत. 

या रस्त्यांची कामे मंजूर

  • नाशिकरोड मालधक्का रोड व रेल्वेस्टेशन जोडरस्ते विकसित करणे (कॉक्रिटीकरण) - १०.०५ कोटी

  • नाशिकरोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते सत्कार पॉइंट रस्ता (काँक्रिटीकरण)- ११.६५ कोटी

  • अमृत मिरवणूक मार्ग विकसित करणे (काँक्रिटीकरण)-२५ कोटी

  • मुंबई नाका ते त्र्यंबक नाका रस्ता विकसित करणे (व्हाइट टॅपिंग)- १४.४३ कोटी

  • चांदशी पूल ते जेहान सर्कल ते एबीबी सर्कल ते सिटीसेंटर मॉल पूलपर्यंतचा रस्ता विकसित करणे (डांबरीकरण)- ५९.५९ कोटी

  • सिटी सेंटर मॉल पूल ते इंदिरानगर अंडरपासपावेतो रस्ता विकसित करणे (डांबरीकरण)- १३.१९ कोटी

  • टाकळी मलनिःसारण केंद्र ते आरटीओ कार्यालय पेठ रोड, मखमलाबाबत रोडपावेतो रस्ता विकसित करणे (काँक्रिटीकरण)- १२९.२३ कोटी

  • रस्ता विकसित करणे (डांबरीकरण) पिंपळगाव खांब फाटा ते वडनेर गेटपावतोचा- १८ कोटी

  • नाशिक पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव ते पिंपळगाव खांबपर्यंत रस्ता विकसित करणे (डांबरीकरण)- १७.४१ कोटी