nashik, dwarka chowk Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Kumbh Mela 2027: द्वारका चौकातील कोंडी फुटणार! 36 कोटींचा नवा रस्ता, पाणीपुरवठा योजना आणि 'पेंट माय सिटी'ला ग्रीन सिग्नल

पुणे रोड ते संभाजीनगर रोड आता थेट जोडला जाणार; १५ हजार स्वयंसेवकांचे प्रशिक्षण आणि 'पेंट माय सिटी' अभियानासह कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहराच्या पायाभूत सुविधांना 'बूस्टर डोस' देणारे महत्त्वाचे निर्णय कुंभमेळा प्राधिकरणाने घेतले आहेत. शहरातील सर्वात मोठी समस्या असलेल्या द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जनार्दन स्वामी मठ ते ड्रीमसिटी चौकापर्यंतच्या ३० मीटर रुंद विकास रस्त्यासाठी ३६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अनेक प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये आली आहे. साधुग्राम, शाहीमार्ग आणि घाटांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांचा विस्तार करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने निधीची तरतूद सुरू केली आहे. शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन बैठकीत नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या ३६ कोटींच्या रस्ते प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

द्वारका चौकासाठी 'बायपास'
नाशिकच्या मंजूर विकास आराखड्यानुसार, जनार्दन स्वामी मठ (छत्रपती संभाजीनगर रोड) ते लक्ष्मी नारायण मंदिर पूल ते ड्रीमसिटी चौक हा ३० मीटर रुंद रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. हा रस्ता थेट राष्ट्रीय महामार्ग ६० (नाशिक-पुणे रोड) ला छत्रपती संभाजीनगर रोडशी जोडतो. २०१५ च्या कुंभमेळ्यात हा रस्ता केवळ १५ मीटर रुंद होता. मात्र, २०२७ मध्ये भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन तो आता ३० मीटर रुंद केला जाणार आहे. यामुळे द्वारका चौकातील प्रचंड वर्दळ कमी होण्यास मदत होणार असून, नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून येणाऱ्या भाविकांसाठी हा रस्ता मोठा दिलासा ठरेल.

पाणीपुरवठा आणि आपत्ती व्यवस्थापनावर भर
केवळ रस्तेच नाही, तर साधुग्रामासाठी चोवीस तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी गंगापूर धरण पंपिंग स्टेशन आणि जलशुद्धीकरण केंद्रांमधील पंपिंग यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, सिंहस्थ काळात गर्दीचे नियोजन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी १५ हजार स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

'पेंट माय सिटी' आणि हायटेक कुंभमेळा
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर शहरांचे सौंदर्य वाढवण्यासाठी 'पेंट माय सिटी' अभियान राबवले जाणार आहे. यामध्ये लोकसहभागातून शहराचे सुशोभीकरण केले जाईल. विशेष म्हणजे, आगामी कुंभमेळा अधिक हायटेक करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ (Website) तसेच अँड्रॉइड आणि आयओएस अ‍ॅप विकसित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून भाविकांना घाटांची माहिती, शाही मार्गाचे नकाशे आणि आपत्कालीन सेवांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

या बैठकीला कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे नाशिकच्या औद्योगिक आणि नागरी विकासाला नवी गती मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • जनार्दन स्वामी मठ ते ड्रीमसिटी ३० मीटर रुंद रस्त्यासाठी ३६ कोटींच्या खर्चास मंजुरी.

  • द्वारका चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवा रस्ता 'कनेक्टर' म्हणून काम करणार.

  • सिंहस्थासाठी १५ हजार स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळणार.

  • गंगापूर धरण पंपिंग स्टेशनमध्ये नवी यंत्रणा बसवून साधुग्रामाचा पाणीपुरवठा सुरळीत करणार.

  • भाविकांसाठी विशेष मोबाईल अ‍ॅप आणि वेबसाईट विकसित करण्यावर शिक्कामोर्तब.

  • शहर सौंदर्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 'पेंट माय सिटी' अभियान