simhastha maha Kumbh Nashik, sadhugram Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Kumbh Mela Infra: साधुग्रामसाठी जमीन अधिग्रहणाचा निर्णय? मुख्यमंत्र्यांनी काय केली घोषणा?

Devendra Fadnavis: 23 हजार कोटींची कामे सुरू; कुंभमेळ्यापूर्वी पायाभूत सुविधा पूर्ण करण्यावर सरकारचा भर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विकास कामांचा वेग वाढवत ३५ हजार कोटी रुपयांच्या कामांची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी केलेली घोषणा पाहता साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहणाचा पर्यय समोर येऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढीलवर्षी होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळानिमित्ताने कुंभमेळा प्राधिकरणाने आतापर्यंत जवळपास २३ हजार कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. त्यातील बहुतांश कामे सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची कामे करण्यात येत असल्याचे वक्तव्य केले आहे.

नाशिक येथे अखिल भारतीय संत समिती राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप प्रसंगी श्री स्वामी नारायण मंदिर येथे मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे. यामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरमधील विकास आराखड्यात समाविष्ट असलेली, मात्र अद्याप मान्यता न मिळालेल्या कामांना नजिकच्या काळात मान्यता मिळण्याची तसेच साधुग्रामसाठी कायमस्वरुपी जमीन अधिग्रहण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

विकासकामांना वेग

अखिल भारतीय संत समिती-राष्ट्रीय कार्य समितीच्या दोन दिवसीय बैठकीचा समारोप प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रक्रियेत साधू - महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचेही स्पष्ट केले.

कार्यक्रमाला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अखिल भारतीय संत समिती अध्यक्ष अविचल देवाचार्यजी, महंत श्री ग्यान देवसिंग महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रविंद्रपुरी महाराज आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, भाविकांना गोदावरीच्या निर्मळ आणि प्रवाही पाण्यात स्नान करता यावे, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्र्यंबकेश्वर येथे गोदावारीचा प्रवाह बारमाही व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कुशावर्तासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर रस्ता, नाशिक परिक्रमा मार्ग, रेल्वे स्थानकावरील सुविधा, घाटांची संख्या आणि लांबी वाढविणे, जुन्या मंदिरांचे संवर्धन, मंदिराकडे जाणाऱ्या मार्गांचे रुंदीकरण, ओझर विमानतळाचे विस्तारीकरण आदी विकास कामे सुरू आहेत, याचा पाढा मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवला.

साधुग्रामबाबत काय म्हणाले सीएम?

त्याचवेळी सिंहस्थाच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या साधुग्रामबाबतही त्यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. मुख्यमंत्री म्हणाले, साधूग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन अधिग्रहणाचा निर्णय घेण्यात आला आहे. साधूग्राममध्ये आवश्यक सर्व पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे सिंहस्थासाठी कायमस्वरुपी आरक्षण टाकलेल्या ३७० एकर जमिनीचे अधिग्रहण याच सिंहस्थापूर्वी होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

कुंभमेळ्याकरीता प्रयागराजच्या धर्तीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या सूक्ष्म आणि नेटक्या नियोजनासाठी नाशिक येथील अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रयागराजचा दौरा केला होता.

मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा दहा पट अधिक भाविक येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. विकासकामे करतांना साधू, महंत आणि आखाड्यांकडून आलेल्या सूचनांचाही स्वीकार करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

भोंदूगिरीविरोधात कडक कारवाई
कुंभमेळा भारतीय अध्यात्मिक संस्कृतीचा सर्वांत मोठा सोहळा आहे. मन आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा हा सोहळा आहे. विचारांच्या प्रदूषणाला दूर सारून भारतीय संस्कृतीला प्रवाहीत करण्याचे हे पर्व आहे. या सोहळ्यात सर्व जाती-धर्माचे भाविक सहभागी होत असल्याने कुंभमेळा हा राष्ट्रीय एकात्मतेचे आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिक आहे, असेही त्यांनी सांगितले.

कुंभमेळ्यात केवळ पवित्र स्नान होत नाही, तर साधू, संतांचे मार्गदर्शन, विचारांचे आदान, प्रदान होत असल्याने पुढील वर्षी होणारा  सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे समाजातील गैरप्रकारांना आळा बसेल, तसेच भोंदूगिरी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.