नाशिक (Nashik): नाशिक शहरात रस्त्यांची कामे एकाचवेळी सुरू असल्याने संपूर्ण शहरातील रस्ते खोदून ठेवल्याचे चित्र आहे. त्यातच मागील आठवड्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने या खोदलेल्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यातील कामांचे पितळ उघड झाले होते. यामुळे रस्त्यांची कामे कासवगतीने केल्याने महापालिकेने चार ठेकेदारांना दणका दिला असून त्यांच्यावर दंडाची आकरणी केली आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक महापालिका हद्दीत २८ प्रमुख रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. त्यात रस्त्यांचे रुंदीकरण, कॉंक्रिटीकरण या कामांचा समावेश आहे. मात्र, ही कामे सुरू करण्यापूर्वी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पाणीपुरवठा, ड्रेनेज, ऑप्टिकल फायबर केबल, पीएनजी वाहिनी, पावसाळी गटारी आणि वीज केबलची कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकदा रस्त्यांची कामे झाल्यांनतर या डक्टसाठी पुन्हा रस्ते खोदण्याची गरज पडू नये, हा यामागील हेतु आहे. मात्र, या डक्टच्या कामांनी उशीर झाल्यामुळे बहुतांश रस्त्यांच्या कामांनाही गती मिळू शकत नाही व सर्व प्रमुख रस्ते खोदून ठेवल्याचे चित्र शहरभर निर्माण झाले आहे.
या विकासकामांमुळे नाशिककरांना सध्या अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच जोरदार पावसामुळे संपूर्ण शहरात सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी पाणी साचून संपूर्ण रस्त्यांवर चिखल तयार झाला होता. त्यातून वाहने चालवणे अशक्य झाले होते. त्या चिखलामुळे अनेक अपघात झाले. यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या बांधकाम विभागाने त्यावर उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
याप्रकरणी काम करण्यास उशीर केला म्हणून चार ठेकेदारांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात सातपूर-अंबड लिंकरोड आणि दिंडोरी रोडचे काम करणाऱ्या एसबीडी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीला दिवसाला ९१ हजार रुपये दंड आकारला जात आहे. मखमलाबाद रोडचे काम करणाऱ्या महालक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीला दररोज दहा हजारांचा दंड आकारला जात आहे.
बांधकाम विभागाने आतापर्यंत दोन वेळा नोटीस बजावून कामांविषयी तंबी दिली आहे. असे असताना संबंधित काही ठेकेदारांकडून त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर महापालिकेच्या बांधकाम विभागाने चार ठेकेदारांना आर्थिक दंड आकारण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याचबरोबर अन्य दोन ठेकेदारांना दररोज एक हजार रुपये इतक्या दंडाची आकारणी केली जात आहे.
या कारवाईमुळे पावसानंतर शहरातील कामांना वेग आला असून संततधार पाऊन सुरू होण्यापूर्वी पाणीपुरवठा, ड्रेनेज, ऑप्टिकल फायबर केबल, पीएनजी वाहिनी, पावसाळी गटारी आणि वीज केबलची कामे पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदार कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.