Nashik, Trimbakeshwar Darshanpath Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: नाशिकमधील 'त्या' सरकारी कार्यालयांसह उपजिल्हा रुग्णालयाचे होणार स्थलांतर

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनपथ टप्पा दोनला प्रशासकीय मान्यता; उपजिल्हारुग्णालयासह सरकारी कार्यालयांचे स्थलांतर

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळापूर्वी त्र्यंबकेश्वर येथे भाविकांना सुलभपणे दर्शन घेता यावे यासाठी कुंभमेळा प्राधिकरणने दर्शनपथचा दुसरा टप्पा उभारण्यासाठी १९३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीतून दर्शनपथ टप्पा दोनची कामे तसेच शेजारील गोदावरीवर घाट उभारण्यात येणार आहे. याशिवाय नारायण नागबली, त्रिपिंडी आदी विधींसाठी भाविकांना सुविधा पुरवण्यात येणार आहे.

दर्शनपथचा दुसरा टप्पा उभारणीसाठी सरकारी कार्यालये व उपजिल्हा रुग्णालय यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर येथे तीर्थक्षेत्र विकास निधीतून दर्शन पथ, डीपी रोड व शौचालय उभारण्यासाठी राज्य सरकारने निधी दिला असून यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्याकडून कामांची पूर्वतयारी सुरू झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना सुलभपणे दर्शन घेता यावे तसेच त्यांना एकाच छताखाली सुविधा मिळून दर्शन घेणाऱ्यांची संख्या वाढावी यासाठी दर्शनपथचा विस्तार करण्यास म्हणजे टप्पा दोनचे काम करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबरमध्ये तत्वता मान्यता दिली होती.

टप्पा दोन उभारण्यासाठी मंदिरालगतचे व्यवसाय विस्थापित होणार, सरकारी कार्यालये, उपजिल्हा रुग्णालय स्थलांतरित करावे लागणार आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वर पालिका निवडणूक काळात हा मुद्दा बनवल्यानंतर मधल्या काळात या विषय मागे पडला होता.

दरम्यान त्र्यंबकेश्वर येथील सरकारी कार्यालये स्थलांतरित करून पेगलवाडी फाटा येथे मध्यवर्ती इमारतीसाठी जागा उपलब्ध झाल्यानंतर दर्शनपथ टप्पा दोनचा विषय पुन्हा समोर आला. त्यानुसार कुंभमेळा प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दर्शन पथ टप्पा क्रमांक दोनच्या कामास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या सोबत त्र्यंबकेश्वर मंदिरालगत गोदावरी-अहिल्या संगमावर घाट उभारण्याच्या कामासही प्रशासकीय मान्यता दिली आहे. दोन्ही कामांसाठी १९३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

याच संगमावर नारायण नागबली, कालसर्प शांती, त्रिपोंडी श्राद्ध विधीकेले जातात. तेथे भाविकांसाठी सोयीसुविधा करण्यासाठी विधिभवन उभारले जाणार असून त्यासाठी ५१ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. दर्शनपथामुळे मंदिर परिसरातील अनेक व्यावसायिक विस्थापित होणार आहे. त्यांच्यासाठी व्यावसायिक गाळे उभारून दिले जाणार असून त्यासाठी व उद्यान उभारणी यासाठी ४९ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

याशिवाय त्र्यंबकेश्वर मंदिर ते कुशावर्त तीर्थ या शिव दर्शनपथाची उभारणी, सुशोभीकरण या कामासाठी ९७ कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही सर्व कामे करण्याची जबाबदारी महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे.

उपजिल्हारुग्णालयाचे स्थलांतर

त्र्यंबकेश्वर दर्शनपथ टप्पा दोन मुळे सरकारी कार्यालयांप्रमाणेच त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर करावे लागणार आहे. ते करताना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी उपजिल्हारुग्णालय तुपादेवी फाटा येथील स्वामी विवेकानंद मिशनच्या रुग्णालयात चालवले जाणार आहे.