River Linking Project, Godavari, Damanganda Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाबाबत आली Good News! 43 वर्षांची प्रतीक्षा संपली

जलसंपदाकडून 4116 कोटींचे टेंडर; नाशिक, जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा प्रकल्प

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): गेल्या ४३ वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या नार-पार-गिरणा (Nar Par Girna) या नदीजोड प्रकल्पाचे ४११६ कोटींचे टेंडर (Tender) जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केले आहे.

मागील वर्षी २०२४ मध्ये राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली होती. हा प्रकल्प नाशिक आणि जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरणार आहे.  या प्रकल्पातून नार आणि पार या पश्चिम वाहिनी नद्यांमधील १०.७६ टीएमसी पाणी गिरणा नदीत वळवले जाणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील पेठ व सुरगाणा तालुक्यातून वाहणाऱ्या नार, पार औरंगा व अंबिका या नद्यांचे पाणी पश्चिमेकडे अरबी समुद्रात वाहून जाते. ते पाणी पूर्वेकडील गिरणा नदीपात्रात वळवल्यास त्याचा नाशिक व जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी भागाला फायदा होईल, असा सर्व्हे नाशिक मधील हरिभाऊ जाधव यांनी १९८२ मध्ये केला होता. तेव्हापासून नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्प मार्गी लागावा अशी मागणी होती.

त्यानंतर नाशिकमधील मालेगाव, देवळा, कळवण, बागलाणसह जळगाव जिल्ह्यात प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकीत हा नदीजोड प्रकल्प निवडणूक प्रचाराचा मुद्दा राहिलेला आहे.

नार, पार, औरंगा आणि अंबिका या चार पश्चिमी वाहिनी नद्या नाशिकमधील पेठ व सुरगाणा या तालुक्यांत उगम पावतात. पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात. हे अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अतितुटीच्या गिरणा उपखोऱ्यात टाकले जाणार आहे. प्रदीर्घ काळ रखडलेल्या योजनेचे टेंडर प्रसिद्ध झाल्याने आता या प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नार पार नदी जोड प्रकल्पाला सात हजार ४६५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी  ४११६ कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले असून या निधीतून भूसंपादन, पुनर्वसन, प्रकल्पाचा आराखडा आणि बांधकाम आदींचा समावेश आहे.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात नऊ धरणे बांधली जातील व त्या धरणांमधून पाणी उचलून ते पूर्वेकडे वाहणाऱ्या गिरणा नदीत सोडले जाईल. हे पाणी धरणे, बोगदे आणि कालव्यांच्या माध्यमातून नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये आणले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात धरणे आणि त्यांच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामाचा समावेश आहे, नंतर  दुसऱ्या टप्प्यातील टेंडरमध्ये कालवा, पाइप वितरण जाळे आणि गिरणा उपखोऱ्यातील चणकापूर धरणात पाणी पोहोचवण्यासाठी आवश्यक बाबींच्या कामांचा समावेश असणार आहे. 

नाशिक जळगावला ९.५ टीएमसी पाणी मिळणार

नार-पार- गिरणा या नदीजोड जोड प्रकल्पातून १०.७६ टीएमसी पाणी अडवले जाणार आहे. त्यापैकी साडेनऊ टीएमसी पाणी नाशिक व जळगाव जिल्ह्यासाठी वापरले जाणार आहे. उर्वरित पाणी धरण परिसरातील स्थानिकांसाठी राखीव ठेवले जाईल. या प्रकल्पातून नाशिक जिल्ह्यातील २५,३१८ हेक्टर, जळगाव जिल्ह्यातील १७,०२४ हेक्टर आणि धरणांच्या परिसरातील ७,१७४ हेक्टर, असे ४९,५१६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

चनकापूर कालव्याचे २६ किलोमीटर काम

तापी खोरे विकास महामंडळाने नार पार गिरणा या नदीजोड प्रकल्पातून चनकापूर कालव्याच्या २६ किलोमीटर कामाचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. या कामाची किंमत ५६.४७ कोटी रुपये आहे. हे काम दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.