नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे पूर्ण करण्यासाठी आता केवळ सहा-सात महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आधी सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याचवेळी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचा सिलसिला सुरू असून, रामवाडी ते घारपुरे घाटदरम्यानच्या नव्या पुलासाठी ४१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
नाशिक महापालिकेच्या प्रस्तावानुसार सिंहस्थ प्राधिकरणाने या पुलाला मंजुरी दिली असून, पुलाची उभारणी करण्याची जबाबदारी नाशिक महापालिकेकडे आहे. हे काम मार्च २०२७पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सिंहस्थाच्या कामांची प्रगती २७ टक्के
सिंहस्थ प्राधिकरणाने नाशिक, त्र्यंबकेश्वरसह अहिल्यानगर जिल्ह्यातील आतापर्यंत १०४ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांची किंमत अंदाजे १५ हजार कोटी रुपये आहे. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांकडून राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग, रेल्वे स्थानक, विमानतळ आदी कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे.
ही सर्व कामे मार्च २०२७पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र, विविध कारणांमुळे कामांची प्रगती मंदावली असून, मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढाव्यात कामांची प्रगती केवळ २७ टक्के असल्याचे समोर आले होते. अपेक्षित प्रगतीपेक्षा ही १७ टक्के कमी असल्याचेही आढळले होते.
नाशिक महापालिका हद्दीतील कामे गणेशोत्सवाच्या काळात थांबवण्याचे निर्देश देण्यात आले होते. आता पाऊस उघडला असून कामांना वेग देण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. मोठ्या कामांचा महत्त्वाचा भाग सिंहस्थापूर्वी, तर उर्वरित कामे सिंहस्थानंतर पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे.
द्वारका चौकातील कामांपैकी नाशिक-पुणे मार्गावरील भुयारी मार्ग आणि त्यालगतच्या सर्व्हिस रोडचे काम सिंहस्थापूर्वी पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित कामे सिंहस्थानंतर केली जाणार आहेत.
दरम्यान, महात्मानगर ते मोतीवाल कॉलेज या गंगापूर रोडला समांतर रस्त्याच्या कामासाठी ६५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर आठवडाभरात रामवाडी ते घारपुरे घाट पुलासाठी ४१ कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे.
पुलामुळे पूररेषेचा मुद्दा
नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर २००३ आणि २०१५च्या सिंहस्थांच्या काळात अनेक पूल उभारण्यात आले. या पुलांमुळे पावसाळ्यात नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होत असल्याचे यापूर्वी निदर्शनास आले आहे. २०१७मध्ये गोदावरीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पुलांमुळे पाण्याच्या प्रवाहावर परिणाम झाल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यामुळे गोदावरीच्या काठावरील पूररेषेची पातळी वाढल्याचेही सांगण्यात आले होते.
मखमलाबाद शिवारात जाण्यासाठी गोदावरीवर मंजूर करण्यात आलेल्या पुलाला आमदार देवयानी फरांदे यांनी पूररेषेच्या कारणावरून विरोध केला होता. त्यामुळे या सिंहस्थात नादुरुस्त रामसेतूचे पाडकाम करून तेथे प्रस्तावित रामझुला वगळता गोदावरीवर नवीन पुलाचे काम मंजूर करण्यात आले नव्हते.
मात्र, आता नाशिक महापालिकेच्या प्रस्तावानुसार अगदी शेवटच्या टप्प्यात रामवाडी ते घारपुरे घाट या नव्या पुलाला मंजुरी देण्यात आली आहे.
वाहतूक कोंडीवर उपाय
अशोकस्तंभ ते रविवार कारंजा या दरम्यान एकेरी वाहतूक असूनही अरुंद मार्गामुळे या परिसरात कायम वाहतूक कोंडी होते. पंचवटीत जाण्यासाठी वाहनधारकांकडून रामवाडी पुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे रामवाडी पुलावरही वाहतुकीचा ताण वाढतो.
या पार्श्वभूमीवर रामवाडी पुलाला पर्याय म्हणून घारपुरे घाटाशी जोडणारा नवा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या पुलामुळे अशोकस्तंभ परिसरातील वाहतूक कोंडीला काही प्रमाणात आळा बसेल, असा अंदाज आहे.
Key Points
रामवाडी ते घारपुरे घाट जोडणाऱ्या नव्या पुलासाठी ४१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता
सिंहस्थ प्राधिकरणाची मान्यता; कामाची जबाबदारी नाशिक महापालिकेकडे
मार्च २०२७पर्यंत पूल पूर्ण करण्याचे निर्देश
सिंहस्थाशी संबंधित १०४ कामांना आतापर्यंत अंदाजे १५ हजार कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता
सिंहस्थाच्या कामांची मागील महिन्यातील प्रगती २७ टक्के
रामवाडी पुलाला पर्याय उपलब्ध करून वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न
गोदावरीवरील नव्या पुलामुळे पूररेषेचा मुद्दा पुन्हा चर्चेत