नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नाशिक पुणे महामार्ग व मुंबई आग्रा महामार्ग यांची चौफुली असलेल्या द्वारका सर्कल येथे भूयारी मार्गाचे काम सुरू साहे. मुख्य चौकाच्या कामामुळे येथील सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आणखी तीन महिने वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. १९ एप्रिल ते १८ जुलै या कालावधीत म्हणजेच सलग ३ महिन्यांसाठी या चौकात वाहनांसाठी २४ तास बंदी लागू राहणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा काळात नाशिक शहरात मोठ्यासंख्येने भाविक येणार असल्याने या चौकातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने २१४कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून द्वारका चौक येथे पुणे बाजूकडे जाणाऱ्या अंडरपासच्या बांधकामाला फेब्रुवारीत सुरुवात करण्यात आली आहे.
या अंडरपासच्या बांधकामामुळे होणारी वाहतूक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी द्वारका चौकात अवजड वाहने, खासगी प्रवासी बसेस, एसटी बसेस तसेच सिटीलिंक बसेस यांना एप्रिल अखेरपर्यंत प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, एपिल अखेरपर्यंत हे काम होणे शक्य होणार नसल्याने त्या कामाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
यामुळे मुख्य उड्डाणपुलाखाली सुरू असलेल्या खोदकामामुळे वाहतुकीला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आता सुधारित अधिसूचना जारी करीत द्वारका चौकातील सर्व बाजूंनी येणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आले आहे. सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
पुणे मार्गावरून येणारी व मुंबईकडे जाणारी वाहने सिन्नर फाटा-रेल्वे क्रॉसिंग-बागुलनगर- विहितगाव सिग्नल-वडनेर रोड-पाथर्डी फाटा-गरवारे मार्गे पुढे जातील.
पुणे मार्गावरून येणारी व त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहने याच मार्गाने अंबडगाव एक्सलो पॉईंटमार्गे सातपूरकडे वळवली जातील.
सातपूर, सीबीएस वरून नाशिकरोडकडे जाणारी वाहने मुंबईनाका-भाभानगर-नागजी सिग्नल-काठे गल्ली सिग्नल मार्गे जातील.
नाशिकरोडवरून पंचवटीकडे जाणारी वाहने फेम सिग्नल–मेट्रो मॉल जंक्शन येथे वळून ट्रॅक्टर हाऊस मार्गे वळवण्यात आली आहेत.
सिटीलिंक बस मार्गातील बदल
नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेच्या सर्व बसेस या तपोवन बस टर्मिनल येथून सुटणार आहेत. या बसेस शालीमार-सारडा सर्कल-मदीना चौक-वडाळा नाका-नागजी सिग्नल-फेम सिग्नलमार्गे नाशिकरोडकडे जातील. या बसेस नाशिकरोडवरून शालीमारकडे येताना त्याच मार्गाचा वापर करणार आहेत.
एसटीच्या बसेससाठी विशेष मार्ग
नाशिकरोडवरून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसेस सिन्नर फाटा-दत्तमंदिर-सम्राट सिग्नल-संत सावता माळी मार्ग-वडाळा-मुंबईनाकामार्गे पुढे जातील. निमाणी बसस्थानकावरून धुळे, मालेगाव, दिंडोरी, पेठ, वणी आदी ठिकाणांसाठी बससेवा पूर्ववत राहणार आहे.
अवजड वाहनांसाठी नियम
अवजड वाहनांना केवळ रात्री १० ते सकाळी ८ वेळेतच शहरातून मार्ग दिला जाणार आहे. ही वाहने सिन्नर फाटा-फेम सिग्नल-रविशंकर मार्ग-पाथर्डी फाटा-गरवारे पॉईंटमार्गे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून वळवली जातील.