

नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या महामार्गांवरून नाशिक शहरात येणारी वाहतूक शहराबाहेरून परस्पर वळवण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेला सिंहस्थ परिक्रमा मार्ग अर्थात रिंगरोडसाठी राबवण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेला राज्य शासनाने विशेष मान्यता दिली आहे.
या मार्गासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनापैकी सुमारे ५० टक्के क्षेत्र थेट खरेदीने देण्यास शेतक-यांनी संमती दिली आहे. यामुळे महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाने राबवलेल्या टेंडर प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे टेंडरमध्ये सर्वात कमी दराने पात्र ठरणाऱ्या बोलीदारांना पुढील आठवड्यात कार्यादेश दिले जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. यामुळे रिंगरोडच्या प्रत्यक्ष कामास सुरवात होणार असून नियोजनाप्रमाणे ३१ मार्च २०२७ पूर्वी या महामार्गाचे काम पूर्णत्वास जाऊ शकते.
सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिक शहराबाहेरून ६६.७०० किलोमीटर लांबीचा परिक्रमा मार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचा खर्च केंद्र सरकारचे रस्ते व परिवहन विकास मंत्रालय करणार असून त्यासाठी भूसंपादन खर्च राज्यसरकार उचलणार आहे.
हा प्रकल्प उभारण्याची जबाबदीरप महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे सोपवण्यात आली आहे. या मार्गासाठी भूसंपादनावर अंदाजे तीन हजार ६५९.४७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने त्यास मान्यता दिली आहे.
तसेच, केंद्र सरकारच्या रस्ते मंत्रालयाकडून सुमारे तीन हजार ९५४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असून महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने या मार्गाचे पाच पॅकेजेस करून त्यानुसार अनिवार्य कर कपाती वगळता ३१२० कोटी रुपयांचे टेंडर डिसेंबरमध्ये प्रसिद्ध केले होते.
सामान्यतः कोणत्याही मोठ्या प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण झाल्यावरच प्रत्यक्ष काम सुरू केले जाते. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी या रिंगरोडचे काम पूर्ण करायचे असल्याने भूसंपादन कायद्यीतील तरतुदीचा आधार घेत जिल्हा प्रशासनाने ५० टक्के क्षेत्र थेट खरेदी पद्धतीने अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत १४० हेक्टर क्षेत्र थेट खरेदीने देण्यास जमीन मालकांनी संमती दिली आहे. त्यानुसार भूसंपादन कायद्यातील तरतुदीनुसार सिंहस्थ कुंभमेळ्याची निकड लक्षात घेऊन शासनाने ५० टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर काम सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या विशेष निर्णयामुळे प्रत्यक्ष कामांना लवकर प्रारंभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑक्टोबरमध्ये ध्वजारोहणाने कुंभमेळ्याची औपचारिक सुरुवात होणार असून, त्यानंतर पर्वणी स्नानाच्या काळात लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दाखल होतील.अशा वेळी शहरातील दैनंदिन वाहतूक आणि भाविकांची ये-जा सुरळीत राहावी, यासाठी परिक्रमा मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल. बाहेरून येणारी जड वाहतूक शहरात न आणता ती बाह्य वळण मार्गाने वळवणे शक्य होणार आहे.
दरम्यान, भूसंपादन प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांकडून विरोध व्यक्त करण्यात येत आहे. मोबदला, मोजणी आणि जमीन हस्तांतरणाशी संबंधित प्रश्नांवर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने भूसंपादनासाठी महापालिका हद्द व महापालिका हद्दीबाहेरील क्षेत्र, अशी वर्गवारी केली आहे.
महापालिका क्षेत्राबाहेरील जमीन थेट खरेदी पद्धतीने देण्यास शेतकरी तयार असल्याने त्या संदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केल्या जात आहेत. महापालिका हद्दीतील रिंगरोड हा २०१७ च्या विकास आराखड्यानुसार व्हावा,यासाठी जमीन मालक आग्रही असल्याने त्या मार्गाच्या आरेखनाची संयुक्त पाहणी केली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे.