नाशिक (Nashik): उज्जैन व वाराणसीच्या धर्तीवर ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर येथे कॉरिडॉर उभारण्याच्या प्रक्रियेला सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुरवात झाली आहे.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने दर्शनपथासह इतर चार कामांसाठी १७२ कोटींच्या कामाचे टेंडर प्रसिद्धीस दिले असून, स्थानिकांचा कॉरिडॉरला असलेला विरोध लक्षात घेऊन या प्रकल्पास दर्शनपथ असे नाव देण्यात आले आहे. या टेंडरची मुदत २७ नोव्हेंबरपर्यंत आहे. याशिवाय त्र्यंबकेश्वरमधील नव-वसाहतींमधील रस्ते तयार करण्यासाठी १०५ कोटींचे टेंडर प्रसिद्धीस दिले आहे.
त्र्यंबकेश्वर-नाशिक सिंहस्थासाठी केवळ १८ महिन्यांचा कालावधी उरला असताना सिंहस्थासाठी प्राधान्याने करावयाच्या कामांना गती देण्याचे काम सुरू झाले आहे. त्र्यंबकेश्वरला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिल्यानंतर राज्य सरकारने २७५ कोटी रुपये तीर्थक्षेत्र विकास निधी मंजूर केला. या निधीतील कामे करण्याची जबाबदारी सरकारने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळावर सोपवली आहे.
त्यानुसार या महामंडळाने या निधीतून दर्शनपथ, स्वागत इमारत, परिसर विकास, व्यापारी संकुल, भाजी मार्केट व वाहनतळ, नवीन डीपी रोड तयार करणे, शहरातील २० सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम आदी प्रमुख कामे प्रस्तावित करून त्यांचा आराखडा तयार केला आहे.
यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथे उज्जैनप्रमाणे कॉरिडॉर उभारण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावेळी या कॉरिडॉरमुळे विस्थापित होणाऱ्या व्यावसायिकांनी कॉरिडॉरला विरोध केला होता. दरम्यान तो विषय मागे पडला व सरकारने कॉरिडॉर ऐवजी दर्शनपथ उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तीर्थक्षेत्र विकास निधी देण्याचा निर्णय घेऊन ते काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ करणार आहे.
दर्शनपथामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील व्यावसायिक आणि रहिवासी यांना विस्थापित होण्याची धास्ती आहे. त्याचप्रमाणे या दर्शनपथामुळत उपजिल्हा रुग्णालय इमारत पाडावी लागणार आहे. उपजिल्हा रुग्णालयास त्र्यंबकेश्वर गावात दुसरी जागा उपलब्ध नसल्याने ते रुग्णालय शहरापासून दूर स्थलांतरित करावे लागणार असल्याने स्थानिकांचा या कॉरिडॉरला विरोध होता.
आता दर्शनपथ हे नाव दिल्यानेही उपजिल्हा रुग्णालयासह पालिकेची शिवनेरी धर्मशाळाही पाडावी लागणार आहे. मात्र, आता सिंहस्थ अगदी तोंडावर आल्याने विरोध मोडून काढण्याची प्रशासनाने भूमिका घेतली आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील व्यावसायिक या दर्शनपथामुळे बाधित होणार आहेत. या बाधितांना नवीन गाळे देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नववसाहतीत होणार रस्ते
त्र्यंबकेश्वरमधील गावठाण हद्दीबाहेरील नववसाहतींमधील डीपी रोडसाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून १०५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या डीपी रोडच्या १०५ कोटींच्या कामांचेही टेंडर प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
दर्शनपथ निधीतून होणारी कामे
दर्शनपथ : ६७ कोटी रुपये
नवीन डीपी रोड तयार करणे : १०५ कोटी रुपये