नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने गोदावरी स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत. त्यात नाशिक महापालिकेने मलनि:स्सारण केंद्र उभारणे, सांडपाणी गोदावरीत थेट सांडपाणी मिसळू देणे यासारखी कामे केली जात आहेत. त्यात आता नाशिक जिल्हा परिषदेने पानवेली काढण्यासाठी ४३ लाख रुपयांच्या होड्या खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. या होड्यांमध्ये कर्मचारी बसून त्यांच्याकडून नदीतील पानवेली काढून घेण्याची ती योजना आहे.
नाशिक महापालिकेने यापूर्वी मोठे मशिन खरेदी करून त्याच्या माध्यमातून पानवेली काढण्याचे काम सुरू आहे, पण त्यामुळे पानवेलीवर काहीही परिणाम झाला नाही, तेथे या होड्यामुळे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नाशिक शहरात गोदावरीत थेट सांडपाणी मिसळत असल्याने नाशिक ते नांदूर मध्यमेश्वरपर्यंत पानवेलीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. गोदावरीत सांडपाणी मिसळून न देणे हाच यावर उपाय असताना महापालिका प्रशासन यावर वेगवेगळे प्रयोग करून पानवेली कमी करण्याचा देखावा उभे करीत असतात.
महापालिकेने यापूर्वी पानवेली काढण्यासाठी मशीन विकत घेतले होते. त्याने पानवेलीची समस्या जैसे थे राहिली. जिल्हा परिषदेने दोन वर्षांपूर्वी पानवेलीपासून वस्तू बनवण्याचा प्रयोग केला. त्यासाठी चांदोरी (ता. निफाड) येथे महिलांना पानवेलीपासून वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यासाठीआसाम येथून ब्रह्मपुत्रा नदीतून पानवेली मागवणे व महिलांना प्रशिक्षण देणे यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले.
मात्र, गोदावरीतील पानवेलीपासून वस्तू बनवता येत नाही, हे समोर येईपर्यंत लाखो रुपये खर्च झाले व ते स्वप्न भंग पावले. आता सिंहस्थ कुंभमेळा निमित्ताने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या अजेंड्यावर पानवेली हा विषय आला आहे.
नाशिक महापालिका हद्दीबाहेर नाशिक व निफाड या तालुक्यातील जवळपास १५ गावे गोदावरीच्या काठावर आहेत. या गावांमधील सांडपाणी व मलजल थेट गोदावरीत मिसळू नये यासाठी स्वच्छ भारत मिशनमधून जिल्हा परिषदेने यापूर्वीच तेथे मलनि:स्सारण प्रकल्प बसवले आहेत. यामुळे तेथे गोदावरीत थेट पाणी मिसळण्यास अटकाव आला आहे. मात्र, गोदावरीतील पानवेलीची समस्या जशीच्या तशी आहे.
अर्थात नाशिक महापालिका हद्दीत गोदावरीत थेट मिसळणारे सांडपाणी व मलजल यामुळे पानवेलीची समस्या असल्याने त्यावर उपाययोजना होईपर्यंत हा प्रश्न कायम राहणार आहे, हे सर्वांना समजते.
तरीही नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेला या पानवेली काढण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने होड्या खरेदीचा ४३ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे.
या प्रस्तावानुसार गोदावरी काठावरील १५ ग्रामपंचायत क्षेत्रात प्रत्येकी एक होडी दिली जाणार असून त्या त्या ग्रामपंचायतीने त्यांच्या परिसरातील पानवेली काढायच्या आहेत. म्हणजे नाशिक महापालिकेच्या चुकीमुळे गोदावरीत तयार होणाऱ्या पानवेली खाली वाहत जाणार व त्याचा भुर्दंड ग्रामपंचायतींच्या माथी मारला जाणार आहे.