Nashik
Nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गोदावरी'वर होणार आणखी 7 पूल

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Kumbhmela) महापालिकेने तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या सर्व विभागांचे आराखडे सादर झाले असून, त्यांचे एकत्रिकरण करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यात बांधकाम विभागाने गोदावरी व  शहरातून वाहणाऱ्या तिच्या उपनद्यांवर २१ पूल बांधण्याचे आराखड्यात प्रस्तावित केले आहेत. त्यात गोदावरीवर नवीन सात पूल उभारण्याचे प्रस्तावित केले असून, त्यात सध्याच्या दोन पुलांना समांतर नवीन पुलांचा समावेश आहे.

या शिवाय पंचवटी, सिडको, नाशिकरोड आदी भागातील उपनद्यांवरही वाहतूक सुरळीत होण्यासाठी पूल प्रस्तावित केले आहेत. यामुळे मागच्या सिंहस्थाप्रमाणेच या सिंहस्थातही नाशिक शहरात पूल उदंड होणार असल्याचे दिसत आहे.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ - २८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा नियोजित आहे. त्यात नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी येणारे साधू, भाविक यांच्यासाठी सोईसुविधा उभारण्यासाठी नाशिक महापालिका राज्य सरकारला विकास आराखडा सादर करणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी समन्वय समिती स्थापन केली आहे.

समितीच्या अध्यक्षपदी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आहे. त्यांच्याकडे सर्व विभागांना आराखडा सादर करावा लागणार आहे. यामुळे महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या जवळपास ४२ विभागांनी कुंभमेळ्यासाठी विकास आराखडे सादर केले आहेत.

महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत सिंहस्थ कालावधीमध्ये सर्वाधिक कामे होणार आहेत. त्याअनुषंगाने बांधकाम विभागाचा आराखडा सादर करण्यात आला आहे. बांधकाम आराखड्यामध्ये शहरात बाह्य रिंगरोड उभारणी महत्त्वाचा विषय असला तरी बाह्य रिंगरोड राज्यशासनाच्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून तयार करण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

त्यामुळे महापालिकेला अन्य कामांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने बांधकाम विभागाने शहरातील गोदावरीसह नंदिनी, अरुणा, वरुणा व वालदेवी या उपनद्यांवर पूल उभारण्याचा प्रस्ताव आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.

हे पूल उभारण्यासाठी जवळपास २८५ कोटी रुपये अपेक्षित असल्याचा प्रस्ताव आराखड्यात समाविष्ट करण्यात आला आहे. यापैकी गोदावरी नदीवर नऊ, नंदिनी नदीवर सात, वाघाडी नदीवर चार, तर वालदेवी नदीवर एक अशा २१ पुलांचा या आराखड्यात समावेश आहे.

पूर पातळीचे काय?
गोदावरी नदीवर आधीच पुलांची संख्या वाढल्याने गोदावरीच्या पूर पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पूररेषा वरती सरकली असून अनेक नागरी बांधकामे त्यामुळे संकटात सापडली असल्याचे एका संस्थेच्या अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे गोदावरीवर पुलांची संख्या वाढवण्यास नागरिकांचा विरोध आहे.

या स्थितीतही नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागाने गोदावरीवर सात नवीन पूल प्रस्तावित केल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. या नवीन पुलांची उभारणी केल्यास गोदावरीच्या पूरपातळीत वाढ होणार असल्याने हा निर्णय वादात सापडण्याची चिन्हे आहेत.