MSRTC. EV ST Bus Tendernama
उत्तर महाराष्ट्र

MSRTC: इलेक्ट्रिक बस खरेदीचा निर्णय महामंडळाच्या अंगलट आलाय का?

EV ST Bus: इलेक्ट्रिक बसेसमुळे एकट्या नाशिक विभागात एसटीला 2 वर्षांत 22 कोटींचा तोटा

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : पेट्रोल - डिझेलचे दर वाढल्याने तसेच त्या वाहनांमुळे प्रदूषण वाढत असल्याने इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) पर्याय म्हणून बघितले जाते. सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती जाहीर करीत असते. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानेही (MSRTC) इलेक्ट्रिक बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या इलेक्ट्रिक बसेसमुळे महामंडळाच्या एकट्या नाशिक विभागाला गेल्या दोन वर्षांत 22 कोटी रुपये तोटा झाला आहे.

म्हणजे इलेक्ट्रिक बसचा तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाला डिझेलवरील बसपासून मिळालेले उत्पन्न वापरावे लागत आहे.

इलेक्ट्रिक बसेसमुळे एसटीचा नफा वाढेल व प्रदूषण कमी होईल, असे समजले जात होते. तसेच इलेक्ट्रिक बसमुळे तिकिटांचे दर कमी होतील, प्रवाशांचाही अंदाज होता. यामुळे ऑगस्ट 2023 मध्ये नाशिक विभागात इलेक्ट्रिक बसेसची सुरवात झाली. एसटीने इलेक्ट्रिक बसेस चालवण्याचा निर्णय घेतला, पण स्वतः बस खरेदी करण्यापेक्षा खासगी कंपन्यांच्या बसेस चालवून त्यांना किलोमीटरप्रमाणे भाडे देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार दोन खासगी कंपन्यांच्या बसेस चालवण्यासाठी घेतल्या.नाशिक विभागात पहिल्या वर्षी म्हणजे ऑगस्ट 2023 मध्ये या इलेक्ट्रिक बसेस संख्या फक्त 9 होती.पुढे ती 21,नंतर 33 आणि आता 46 बसेसपर्यंत वाढली आहे.

या खासगी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी एस टी महामंडळाला प्रशासकीय खर्चासह 69 रुपये प्रति किलोमीटर असा खर्च येत आहे. एसटीच्या नाशिक विभागात दोन कंपन्यांच्या बस चालतात, त्यांचे दर वेगवेगळे आहेत.

एका कंपनीच्या 12 मीटर लांबीच्या  बस चालवण्यासाठी एसटीला 69 रुपये, नऊ मीटर लांबीच्या बससाठी 48 रुपये प्रति किलोमीटर खर्च येतो. दुसऱ्या कंपनीच्या 9 मीटर लांबीच्या बससाठी  61 रुपये आणि 12 मीटर बसांचे 68 रुपये प्रति किलोमीटर खर्च येत आहे. या दरामुळे एसटीला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने या इलेक्ट्रिक बस चालवण्यास सुरुवात केल्यापासून एसटी तोट्यात आहे. 

असा झाला तोटा...

पहिल्या आर्थिक वर्षात म्हणजे ऑगस्ट 2023 ते मार्च 2024 या काळात एसटीला 3 कोटी 86 लाख 38 हजार रुपयांचा तोटा झाला. पुढच्या आर्थिक वर्षात एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंत हा तोटा वाढून 10 कोटी 70 लाख रुपये झाला. त्या आर्थिक वर्षात सरासरी 21 इलेक्ट्रिक बसेस चालवल्या जात होत्या. यंदा एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2025 दरम्यान हा तोटा 7 कोटी 69 लाख रुपये झाला आहे.

सहा महिन्यांत 25 कोटींचा खर्च

एप्रिल ते सप्टेंबर 2025 दरम्यान इलेक्ट्रिक बसेस चालवून नाशिक विभागात एसटीला 17 कोटी 69 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर खर्च 25 कोटी 27 लाख 36 हजार रुपये झाला. याप्रकारे फक्त 6 महिन्यांत एसटीला 7 कोटी 57 लाख 86 हजार रुपयांचा तोटा झाला.

नाशिकहून सध्या  पुणे, बोरिवली, कसारा, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गड, सटाणा, छत्रपती संभाजीनगर आदी मार्गावर इलेक्ट्रिक बस चालवल्या जातात. सध्या यांची एकूण संख्या 46 बस आहे. कोट्यवधींचा तोटा होत असताना एसटी प्रशासन या मार्गांवर सेवा सुरू ठेवत आहे. हा आतबट्ट्याचा धंदा एसटी का करीत आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.