gangapur dam Tendernama
उत्तर महाराष्ट्र

गंगापूर धरणातील चर खोदण्याच्या कामाला अखेर मुहूर्त; 9.82 कोटींचे टेंडर

मृतसाठ्यातील ६०० दलघफू पाणी वापरात आणण्याचा प्रयत्न; जून २०२७ अखेर काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): गंगापूर धरणातील मृतसाठ्यातील ६०० दलघफू पाणी नाशिक शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी धरणात चर खोदण्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. नाशिक महापालिकेने या कामासाठी ९ कोटी ८२ लाख ४६ हजार ७८ रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाला की चर खोदण्याची उपाययोजना सुरू करायची आणि त्याबाबत प्रशासकीय पूर्तता होईपर्यंत पावसाळा सुरू होऊन गंगापूर धरण भरले जायचे. त्यामुळे वर्षानुवर्षे हा प्रस्ताव मागे पडत होता. मात्र, यावेळी नाशिक महापालिकेने पावसाळ्यातच या कामाचे टेंडर प्रसिद्ध करून ते काम जून २०२७ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गंगापूर धरणातील पाणीसाठा उन्हाळ्यात कमी झाल्यानंतर पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने महापालिकेसमोर पाणी उचलण्याची अडचण निर्माण होते. त्यामुळे धरणातील तुलनेने दूर असलेल्या पाणीसाठ्यापासून जॅकवेलपर्यंत चर खोदून पाणी आणण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.

आता महापालिकेच्या जलपुरवठा विभागाने त्यासाठी प्रत्यक्ष टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेच्या टेंडरनुसार गंगापूर धरणात चर खोदून गंगापूर डॅम इनटेक वेलपर्यंत पुरेशा प्रमाणात पाण्याचा प्रवाह उपलब्ध करून देणे, हे या कामाचे मुख्य उद्दिष्ट आहे. काम पूर्ण करण्यासाठी कार्यादेश मिळाल्यापासून नऊ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.

सिंहस्थामुळे कामाला वेग?

गंगापूर धरणातील चर खोदण्याच्या कामासाठी महापालिकेने यापूर्वी सल्लागारामार्फत प्रकल्प अहवाल तयार केला होता. या अहवालात या कामासाठी सुमारे १४.५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार कार्यवाही सुरू होण्याच्या आतच पावसाळा सुरू झाल्याने गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा आला. त्यामुळे हे काम पुढील उन्हाळ्यापर्यंत पुढे ढकलले जाईल, असे वाटत होते.

मात्र, पुढील वर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यासाठी या काळात पाऊस कमी झाल्यास गंगापूर धरणातून स्नानासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच झालेला आहे. यामुळे कमी पाऊस झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेने गंगापूर धरणातील ६०० दलघफू पाणीसाठा वापरात आणण्यासाठी ही कार्यवाही सुरू केली असल्याचे दिसत आहे.

खडक फोडण्यासाठी छिन्नीचा वापर

धरणातील चर खोदण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर खडकाचा अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे टेंडरमध्ये खडक उत्खननासाठी चिझेलिंग पद्धतीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय माती, मुरूम आणि वाळूचे उत्खनन, उत्खननाच्या ठिकाणी पाणी उपसा, खोदकामातून निघालेल्या अतिरिक्त मातीची विल्हेवाट, कॉफरडॅम उभारणे व काढणे, पीसीसी कामे, दगडी पिचिंग आणि संरक्षणात्मक कामे केली जाणार आहेत.

तसेच इनटेक व हेडवर्क्समधील गाळ काढणे, ॲप्रोच चॅनेल आणि संबंधित जलरचनांची कामे, सुरक्षा व बॅरिकेडिंग, गुणवत्ता नियंत्रण आणि पर्यावरणीय नियमांचे पालन आदी कामांचाही टेंडरमध्ये समावेश आहे. विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्था सुरू ठेवत टप्प्याटप्प्याने हे काम करण्याची अटही महापालिकेने घातली आहे.

Key Points

  • गंगापूर धरणातील चर खोदण्याच्या कामासाठी ९.८२ कोटी रुपयांचे टेंडर

  • मृतसाठ्यातील ६०० दलघफू पाणी नाशिकच्या पाणीपुरवठ्यासाठी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट

  • गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर जॅकवेलपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी चर खोदला जाणार

  • चर खोदण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित

  • जून २०२७ अखेर काम पूर्ण करण्याचे लक्ष्य

  • कार्यादेश मिळाल्यानंतर कामासाठी नऊ महिन्यांचा कालावधी

  • यापूर्वीच्या प्रकल्प अहवालात सुमारे १४.५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

  • सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर ६०० दलघफू पाणीसाठा वापरात आणण्याच्या दृष्टीने कामाला वेग

  • खडक उत्खननासाठी चिझेलिंग पद्धतीचा वापर

  • कॉफरडॅम, पीसीसी, दगडी पिचिंग, गाळ काढणे आणि ॲप्रोच चॅनेलची कामे टेंडरमध्ये समाविष्ट