PMRDA Tendernama
पुणे

महामेट्रो, PMRDA सह खासगी बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेने का दिला सज्जड दम?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : बांधकामाच्या ठिकाणी प्रदूषण टाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रकल्पांना महापालिकेने (PMC) स्थगितीचा आदेश दिला आहे. तो झुगारणाऱ्यांच्या विरोधात महापालिका राज्य प्रदूषण मंडळाकडे तक्रार करणार आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या अडचणीत भर पडेल, असा इशारा महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिला.

शहरात महापालिका, महामेट्रो, ‘पीएमआरडीए’सह खासगी बांधकाम व्यावसायिकांचे अनेक बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. परिणामी उडणाऱ्या धुळीमुळे हवा प्रदूषण होत असून नागरिकांना खोकला, सर्दी, श्‍वसनाच्या विकारासह डोळ्यांची जळजळ होत आहे.

धुळीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी बांधकामाच्या ठिकाणी हिरवा कापड लावणे, सीमेवर उंच पत्रे लावणे, जमिनीवर पाणी मारणे, धुळीचे प्रमाण मोजण्यासाठी यंत्रसामग्री ठेवणे, अशा उपाययोजना करणे आवश्‍यक आहेत. त्याकडे दुर्लक्ष केल्याने महापालिकेने बांधकाम प्रकल्पांची पाहणी केली. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २०८ प्रकल्पांना काम थांबविण्याचा आदेश दिला होता.

ही कारवाई करून सुमारे अडीच महिने उलटले. आतापर्यंत केवळ ५५ प्रकल्पांनी नियमांची पूर्तता केली. त्यामुळे त्यांना बांधकाम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. अजूनही सुमारे १५० प्रकल्पांनी नियमांची पूर्तता केलेली नाही. तसेच, त्यांच्याकडून महापालिकेला काही कळविण्यात आलेले नाही.

यासंदर्भात महापालिकेत शहर अभियंता वाघमारे यांनी बैठक घेऊन नोटिशीचा आढावा घेतला. त्यावेळी वास्तुविशारदांना बोलविले होते. शहरातील हवा प्रदूषणाची स्थिती गंभीर आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे बांधकाम परवानगी देताना महापालिकेने दिलेल्या नियम-अटी, प्रदूषण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्‍यक आहे.

ज्यांनी नियमांची पूर्तता केली असेल, त्यांच्या कामावरील बंदी उठवली जाईल, असे वाघमारे यांनी सांगितले. मात्र, नोटिशीकडे दुर्लक्ष करून ज्यांनी परस्पर काम सुरू केले. त्यांच्या प्रकल्पाविरोधात कडक कारवाई करण्यासाठी प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली जाणार आहे. त्यातून त्यांच्या अडचणी वाढतील, असेही त्यांनी सांगितले.

‘एअरगन’ मशिनचा तुटवडा

बांधकामाच्या ठिकाणी धूळ ओढण्यासाठी ‘एअरगन’ मशिन बसविणे आवश्‍यक आहे. परंतु, मशिन बाजारात उपलब्ध होत नसल्याने अनेकांना या अटीची पूर्तता करता आलेली नाही. एअरगन बसविल्यानंतर कामाची परवानगी दिली जाणार आहे.