Omprakash Bakoria
Omprakash Bakoria Tendernama
पुणे

...तर PMP चालकांसह ऑपरेटवरही कारवाई करणार; बकोरियांचा सज्जड दम

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : प्रवाशांची हुज्जत घालणे, सिग्नल मोडणे, वेगाने वाहन चालविणे, अशा प्रकरणी जर PMPच्या चालकाविषयी तक्रार प्राप्त झाल्यास केवळ चालकांवरच नाही तर संबंधित चालकांच्या ऑपरेटरवर कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया (Omprakash Bakoria) यांनी दिला आहे.

पीएमपीच्या चालकाविरोधात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. सर्वाधिक तक्रारी या खासगी ठेकेदारांच्या बसवरील चालकांच्या बाबतीत आहेत. यात वेगाने वाहन चालविण्यापासून ते अपघातापर्यंतच्या कारणांचा समावेश आहे. त्यामुळे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी चालकांची वर्तणूक हा विषय गांभीर्यपूर्वक घेतला आहे. काही दिवसांपूर्वी हडपसर येथे ऑपरेटरच्या चालकाने सिग्नलला थांबलेल्या दुचाकीस्वार महिलेला पाठीमागून धडक दिली होती. संबंधित चालकाला तत्काळ बडतर्फ केले होते. त्यानंतर बेशिस्त चालकांना धडा शिकविण्यासाठी अध्यक्षांनी ऑपरेटरच कारवाई करण्याचे ठरविले आहे.

बेशिस्त चालकांमुळे पीएमपीचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता ज्या चालकाविरोधात तक्रारी प्राप्त होतील, त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. जर चालक हे ऑपरेटरचे असतील, तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे.
- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे