पुणे (Pune): पुणे शहरभर सुरक्षेचा दावा करणाऱ्या सीसीटीव्ही यंत्रणेचा डोलारा सध्या डळमळीत झाला आहे. यंत्रणेअंतर्गत लावण्यात आलेले अनेक सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे धूळ खात आहेत. त्यांची देखभाल-दुरुस्ती कोणी करायची? या वादात नादुरुस्त स्थितीत आहेत. परिणामी पोलिस यंत्रणेला गुन्ह्यांच्या तपास कामात अडथळे निर्माण होत आहेत.
शहरात रस्त्यांवर घडणारे गुन्हे, चोरी, दरोडे, हिट अँड रनसारख्या घटनांनंतर तपासासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेतला जातो. मात्र, कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणामध्ये वाहनांच्या नंबरप्लेट स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे आरोपींचा माग घेताना अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी कॅमेरे बंद अवस्थेत असून, कार्यरत कॅमेऱ्यांचा फोकस चुकीचा आहे, तर अनेक कॅमेऱ्यांवर धूळ साचलेली आहे.
देखभाल नाही, जबाबदार कोण?
यंत्रणेसाठी देखभाल यंत्रणा नेमली असली तरी ती अपुरी ठरत आहे. कायदा-सुव्यवस्थेसाठी वापरात मर्यादा येत आहेत. प्रत्यक्षात चित्रीकरणाचा दर्जा खराब असल्याने तो तपासासाठी वापरणे कठीण झाले आहे. शहरातील नागरी सुरक्षेसाठी ही गंभीर बाब असून, यंत्रणेच्या नियमित तपासणी, देखभाल-दुरुस्तीवर महापालिका आणि पोलिस प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
दंड वसुलीवरच भर
शहरात वाहनचालकांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून विविध भागात होणारी कोंडी दूर करण्यासाठी या यंत्रणेचा वापर प्रभावीपणे होणे अपेक्षित आहे. परंतु पोलिसांकडून वाहतूक नियमनाऐवजी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यावरच अधिक भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
दुसऱ्या टप्प्यात २८८० सीसीटीव्ही
शहरात पोलिस प्रशासनाकडून पहिल्या टप्प्यात १३४१ कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यापैकी बरेच नादुरुस्त झाल्यामुळे ते बदलण्याचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील ११०० सीसीटीव्ही बदलण्यात येत आहेत. त्यात फिक्स कॅमेरे, पीटीझेड (पॅन-टिल्ट-झूम) कॅमेरे, एएनपीआर (नंबरप्लेट ओळखणारे) कॅमेऱ्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात २८८० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. टेकड्यांच्या परिसरात ६०९ सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत.
तसेच, ‘एआय’ आधारित अत्याधुनिक १०० सीसीटीव्ही बसविण्याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या चेहऱ्यावरून, कोयत्यासारखे शस्त्र आणि एखाद्या ठिकाणी जमाव एकत्रित झाल्यास त्याची माहिती त्वरित सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात उपलब्ध होणार आहे. जेणेकरून गुन्ह्यास प्रतिबंध करणे शक्य होणार आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त विवेक पवार यांनी दिली.
महापालिकेने शहरात १२०० सीसीटीव्ही बसविलेले आहेत, सध्या १४०० सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी महापालिकेने साडेतीन हजार सीसीटीव्ही बसविले होते. या कालावधीत ठेकेदाराने त्याची देखभाल-दुरुस्ती बघायची होती. आता देखभाल-दुरुस्ती पोलिसांनी करायची की महापालिकेने, हा प्रश्न आहे.
- मनिषा शेकटकर, प्रमुख विद्युत विभाग, पुणे महापालिका