
पुणे (Pune): हडपसर व खडकी टर्मिनल येथील यार्ड व मार्गिका जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम जुलैअखेरपर्यंत पूर्ण होईल. याच्या व्यतिरिक्त अन्य प्रवासी सुविधा वाढविण्यावरदेखील भर दिला जात आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासन या दोन्ही स्थानकावरून नवीन रेल्वे सुरू करण्याच्या तयारीत आहे.
अद्याप नवीन रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळाली नसली तरीही खडकी येथून मुंबई व गुजरातच्या दिशेने व हडपसर येथून सोलापूर व दक्षिण भारताच्या दिशेने नवीन रेल्वे गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे. पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या कोणत्याही गाड्यांचे टर्मिनल मात्र बदलणार नसल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून हडपसर व खडकी स्थानकाचा विकास करून तिथे टर्मिनल केले जात आहे. दोन्ही टर्मिनलचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने यार्ड व मार्गिका जोडण्याचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. हे काम या महिन्याच्या अखेरपर्यंत होणे अपेक्षित आहे. यासह पादचारी पूल, प्रवाशांसाठी वेटिंग रूम, स्वछतागृह आदी कामेदेखील प्रगतिपथावर असून येत्या दोन महिन्यांत हे कामदेखील पूर्ण होण्याची शक्यता आहे.
अशी आहे स्थिती
- पुणे स्थानकावरून दैनंदिन सुमारे १७० ते १८० रेल्वे गाड्या धावतात
- यात पुणे स्थानकावरून प्रवास सुरू करणाऱ्या गाड्या सुमारे ८३
- हडपसर व खडकी टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतरदेखील या गाड्यांचे टर्मिनल बदलले जाणार नाही
- नवीन सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्या मात्र काही प्रमाणात हडपसर व खडकी टर्मिनल येथून सुरू होणार आहे
- आता गाड्यांचे टर्मिनल बदलल्यास प्रवाशांना फटका बसण्याची शक्यता
- प्रवाशांची नाराजी ओढवून घेण्याऐवजी नवीन गाड्या नवीन टर्मिनल सुरू करण्यावर रेल्वे प्रशासन ठाम
हडपसर व खडकी टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. काम पूर्ण झाल्यावर या दोन्ही टर्मिनलवरून नव्या सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या दृष्टीने आवश्यक असलेली व मागणी असलेल्या मार्गावर गाड्या धावतील.
- पद्मसिंह जाधव, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे