Rain Tendernama
पुणे

Pune : एका पावसातच हे हाल? कोट्यवधींच्या नालेसफाईवर प्रश्न; महापालिकेच्या कामांची पोलखोल

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळी गटार आणि नाले सफाईची कामे केली जात आहेत. ही सर्व कामे योग्य पद्धतीने होत असल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. असे असताना मंगळवारी झालेल्या पूर्व मौसमी पावसाने महापालिकेच्या दाव्याचीच पोलखोल केली. जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले, चौकाचौकांत दोन ते तीन फूट पाणी साचले. अनेक ठिकाणी रस्ते खचले अशी भयंकर दुरवस्था एका दिवसाच्या पावसाने झाली आहे. महापालिकेने केलेल्या या कामांचा पावसाने पूर्ण फज्जा उडवला आहे. ‘कमी वेळात जास्त पाऊस पडला’ असा खुलासा करत बसण्यापेक्षा संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का, असा प्रश्‍न पुणेकरांनी उपस्थित केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात होती. पण काही भागांतच पाऊस होत होता. मंगळवारी दुपारी बावधन, कोथरूड, वारजे, धायरी, कात्रज, महंमदवाडी, हडपसर, मुंढवा, कोंढवा, लोहगाव, टिंगरेनगर, विश्रांतवाडी, खराडी, बाणेर, बालेवाडी, नऱ्हे, आंबेगाव, बिबवेवाडीसह अन्य भागांत जोरदार पाऊस सुरु झाला. कात्रज परिसरात पावसाचा जोर मोठा असल्याने आंबिल ओढ्यासह अन्य ओढ्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होती होती. त्यामुळे ओढ्यांच्या शेजारील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. त्यानंतर रात्री सव्वाआठच्या सुमारास पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली. टिळक रस्ता, केळकर रस्ता, मनसेचे जुने कार्यालय, शिवाजी रस्ता, स्वारगेट, सिंहगड रस्ता, कात्रज कोंढवा रस्ता, महात्मा फुले पेठ, नऱ्हे मानाजीनगर, टिंगरेनगर, सोलापूर रस्ता, नगर रस्ता सोमनाथनगर फाटा, पौड रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

ठेकेदार, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

महापालिकेने पावसाळी गटारांच्या स्वच्छतेसाठी तब्बल १२ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. गेल्या चार-पाच दिवसांतील पावसामुळे गटारांच्या चेंबरवर कचरा अडकला होता. तो ठेकेदारांकडून काढून घेण्याची जबाबादारी मलनिःसारण विभागाच्या अभियंत्यांची होती. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर पाणी पावसाळी गटारात न जाता रस्त्यावर वाहू लागले. ज्या ठिकाणी खोलगट भाग आहे, तेथे चेंबर तुंबल्‍याने मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पावसाळी गटारांच्या स्वच्छतेची पोलखोल झाली.

आपत्ती व्यवस्थापन विभागाची तारांबळ

अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश सोनूने यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी मंगळवारी कोथरूड, बाणेर, औंध, शिवाजीनगर भागांतील पावसाळ्यापूर्वीच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. शहरात जोरदार पाऊस झाल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांची यंत्रणा त्वरित आपापल्या हद्दीत मदतीसाठी जाणे आवश्‍यक आहे, त्यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामग्री तयार ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करताना प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, शहराच्या अनेक भागात रस्त्यावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी कर्मचारी व अधिकारी काम करत होते.

माणिकबागेत पुन्हा रस्त्यावर पाणी

सिंहगड रस्त्यावर माणिकबागेत ब्रह्मा हॉटेल चौकातील नाल्याचे पाणी तुंबले, त्याची कलव्हर्टमधून पाणी वाहून जाण्याची क्षमता संपल्याने रस्त्यावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे दुकानात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला होता. गेल्यावर्षी याच ठिकाणी नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेक घर, दुकानांमध्ये पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले होते. धायरी येथे डीएसके विश्‍व रस्त्यावर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी तुंबल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याठिकाणी दरवर्षी पाणी तुंबत असूनही महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.  

ताथवडे उद्यानाचा रस्ता खचला

महापालिकेने काही आठवड्यापूर्वी कर्वेनगर डीपी रस्त्याजवळील ताथवडे उद्यानात सेवा वाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदला होता. हे काम झाल्यानंतर सिमेंट काँक्रिट टाकून रस्ता पूर्ववत केला. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता खचून मोठा खड्डा पडला. याच पद्धतीने आपटे रस्त्यावरही चेंबर खचल्याचा प्रकार घडला आहे.

जबाबदारी निश्‍चित होणार का?

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच महापालिकेत बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वीच्या कामाचा आढावा घेतला. शहरात पाणी तुंबू नये यासाठी पावसाळी गटार व नाले सफाईसाठी २५ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. ही कामे चांगल्याच पद्धतीने झाली पाहिजेत. जर शहरात पाणी तुंबले तर संबंधित अधिकारी व ठेकेदारांची जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश आयुक्तांना दिले होते. त्यानंतर अवघ्या तीन-चार दिवसांतच पाणी तुंबून शहर ठप्प झाले. नागरिकांना प्रचंड त्रास झाला. त्यामुळे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

कशामुळे ओढवली परिस्थिती

१) शहरातील रस्ते एकसमान पातळीत नाहीत

२) अनेक ठिकाणी पावसाळी गटारांचे चेंबर समपातळीत नसल्याने रस्त्यावर पाणी

३) चेंबरच्या झाकणांवर अडकलेला कचरा, माती तशीच

४) पावसाळी गटारांची स्वच्छता करताना पाइपची स्वच्छताच नाही

५) गटारांमधील गाळ वाहून पुन्हा गटारात

६) रस्ते व्यवस्थित झाडले जात नसल्याने कचरा वाहून येण्याचे प्रमाण मोठे