Pune ZP Tendernama
पुणे

पुणे जिल्ह्यातील 'त्या' नागरिकांना मिळणार हक्काचे घर

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : जिल्ह्यात घरकुलांसाठी पात्र असलेल्या; परंतु स्वतःची जमीन नसलेल्या ९७६ भूमिहीन नागरिकांना घरकुले मंजूर झाली आहेत. त्यासाठी गायरान जमिनीचा उपयोग करून लाभार्थ्यांना बांधकामासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे (ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.

पुणे शहरासह जिल्ह्यात जागा घेणे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. जिल्ह्यात जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भल्या-भल्यांना घरासाठी अर्धा-एक गुंठा जागा खरेदी करणे अशक्य झाले आहे. जमिनीला सोन्याचे भाव आल्याने हातावर पोट असलेल्या गरिबांना सरकारी घरकुलासाठी गायरानाची जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. अजूनही काही प्रस्ताव प्रलंबित आहेत.

राज्य सरकारच्या घरकूल योजनेंतर्गत गरजू व पात्र कुटुंबांना घर बांधणीसाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, यापूर्वी अनेक लाभार्थ्यांकडे बांधकामासाठी जागा नसल्यामुळे योजना अर्धवट राहण्याचे प्रकार समोर येत होते. या पार्श्‍वभूमीवर सरकारने जागा नसलेल्या नागरिकांना गायरान जमिनीवर घरकूल मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक बेघर कुटुंबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे.

याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू म्हणाल्या, ‘‘आता घरकूल मंजुरीबरोबर जागाही उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचत आहे.

जिल्‍ह्यात एक जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत ९७८ भूमिहीन नागरिकांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. अशाच प्रकारे ज्‍यांच्‍याकडे घरासाठी जागा नाही, असे एकूण एक हजार प्रस्‍ताव विविध स्‍तरांवर प्रलंबित आहेत. पात्र नागरिकांना त्‍वरित घरकुले मंजूर करण्यात येत आहेत.’’

पात्र असूनही जागेअभावी घरकुले नाहीत

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घरकुलांना जागा मिळण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सातत्याने पाठपुरावा करत आहे. अजूनही एक हजार जणांना घरांसाठी जागा नसल्याने पात्र असूनही घरकुले मिळत नाहीत.

घरकूल बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून समन्वयाने जागा शोधून त्या ठिकाणी घरकुले मंजूर करण्यात येत आहेत. काही ठिकाणी क्लस्टर पद्धतीने घरकुले बांधण्याबाबतही चाचपणी प्रशासनाकडून सुरू आहे.