पुणे (Pune) : धायरी, सिंहगड रस्ता परिसरातील रखडलेल्या डीपी रस्त्याच्या प्रश्नाची दखल थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली असून प्रलंबित रस्त्यांच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करावी, असा आदेश त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिला आहे. त्यामुळे २८ वर्षांपासून रखडलेल्या डीपी रस्त्यांचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.
याबाबत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बनकर यांनी राष्ट्रपतींना निवेदन पाठविले होते. त्याची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हे आदेश दिले आहेत. शहरातील विकास आराखड्यात प्रस्तावित असलेले रस्ते केवळ कागदावरच आहेत.
धायरीतील चार रस्ते डीपीमध्ये प्रस्तावित केले होते, परंतु २८ वर्षांपासून त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. डीपी रस्त्याअभावी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनल्याने संतप्त नागरिकांनी मुंबईतील आझाद मैदानावर लाक्षणिक उपोषण केले होते.
या वाहतूक कोंडीमुळे धायरी फाटा ते धायरी गावादरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह रुग्ण व ज्येष्ठांची गैरसोय होते.
गेल्या १० वर्षांत सिंहगड रस्ता परिसरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतुकीसाठी मुख्य रस्त्यासह गावातील रस्तेही अपुरे पडत आहेत. त्यामुळे डीपी आराखड्यातील रस्ते तातडीने पूर्ण करावेत, अशी मागणी धनंजय बनकर यांनी केली होती.